१९ वर्षीय तरुणी बनणार एक दिवसाची मुख्यमंत्री

१९ वर्षीय तरुणी बनणार एक दिवसाची मुख्यमंत्री

उत्तराखंडमधील हरिद्वारची सृष्टी गोस्वामी रविवारी २४ जानेवारी रोजी एक दिवसाच्या मुख्यमंत्र्यांच्या रुपात दिसणार आहे. २४ जानेवारीला राष्ट्रीय कन्या दिवस असून त्यानिमित्त सृष्टीला ही संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या मंजुरीनंतर सृष्टी एक दिवसाची मुख्यमंत्री बनणार आहे. देशामध्ये अशी घटना पहिल्यांदा घडत आहे. मुख्यमंत्री असताना देखील कुणीतरी एक दिवसाचा मुख्यमंत्री बनणार असल्याने या घटनेची देशभर जोरदार चर्चा आहे.

या दिवशी हरिद्वारच्या बहादुराबाद ब्लॉकमधील दौलतपूर गावाचे नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे. कारण या गावची कन्या सृष्टी गोस्वामी एक दिवसासाठी मुख्यमंत्री होणार आहे. यावेळी सृष्टी एक मुख्यमंत्री म्हणून विकासकामांचा आढावा घेईल. शिवाय १२ विभागातील अधिकारी त्यांच्या विभागातील योजनांबाबतचे ५-५ मिनिटांचे प्रेझेंटेशन तिच्यासमोर सादर करतील. सृष्टीचे वडील प्रवीण पुरी दौलतपुरात किराणा दुकान चालवतात, तर सृष्टीची आई सुधा गोस्वामी गृहिणी आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये बाल विधानसभा संघटनेत बालिका आमदार म्हणूनही सृष्टी गोस्वामीची निवड झाली होती. सृष्टीचे वडील प्रवीण पुरी म्हणाले की, आज त्यांना खूप अभिमान वाटत आहे की त्यांची मुलगी अशा ठिकाणी पोहोचली आहे जिथे अनेक लोकांनी पोहोचण्याचे स्वप्न पाहिले आहे. असे संपूर्ण देशात पहिल्यांदाच होत आहे की, एक दिवसाची का होईना एक मुलगी मुख्यमंत्री होणार आहे.

शिवाजीराव गायकवाड एक दिवसाचा मुख्यमंत्री

‘नायक’ या सिनेमात अनिल कपूर एक दिवसाचा मुख्यमंत्री दाखवला असून शिवाजीराव गायकवाड असे त्याचे नाव असते. खुर्चीवर बसलेल्या मुख्यमंत्री अमरीश पुरीची मुलाखत घेण्यासाठी आलेला पत्रकार अनिल अमरीशसमोर राज्याच्या समस्यांचा पाढा वाचतो. यावर अमरीश म्हणतो- ‘एक दिन सिर्फ एक दिन का सीएम बनके देखो, दाल आटे का भाव पता चल जायेगा’. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान स्वीकारून अनिल एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो आणि मग एक दिवसात काय काय होते… त्याची या सिनेमात रंजक कहाणी बघायला मिळते.

First Published on: January 23, 2021 11:58 PM
Exit mobile version