आशुतोष यांचा ‘आप’ला रामराम

आशुतोष यांचा ‘आप’ला रामराम

आप नेते आशुतोष यांनी दिला राजीनामा

आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. आपचे नेते आशुतोष यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ट्विट करुन पक्षातून बाहेर पडत असल्याची माहिती दिली आहे. वैयक्तीक कारणामुळे राजकारणातून बाहेर पडत असल्याचे कारण आशुतोष यांनी दिले आहे. ५३ वर्षाच्या आशुतोष यांनी पत्रकारिता सोडून राजकारणात प्रवेश केला होता. चार वर्षापासून ते आम आदमी पार्टीच्या नेते पदावर होते.

आपमधून बाहेर पडलेले चौथे नेते

२०१५ मध्ये दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारच्या स्थापनेनंतर आशुतोष हे पक्षापासून वेगळे झालेल्या प्रमुख नेत्यांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहेत. याआधी योगेंद्र यादव, प्रशांत भूषण आणि शाजिया इल्मी यांनी आपला रामराम ठोकला होता. आशुतोष यांचा राजीनामा आपसाठी मोठा धक्का आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपसाठी हा राजीनामा अडचणीचा ठरु शकतो.

केजरीवालांवर होते नाराज

२०१४ मध्ये आशुतोष यांनी आपमध्ये प्रवेश केला होता. चांदणी चौक येथून त्यांनी आपसाठी निवडणुक लढवली होती. मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. मागच्या वर्षीच्या राज्यसभा निवडणुकीच्यावेळी अरविंद केजरीवाल आणि आशुतोष यांच्यामध्ये मतभेद झाले होते. या निवडणुकीवेळी केजरीवाल यांनी सुशील गुप्ता यांना राज्यसभेचे तिकीट दिले होते. त्यामुळे आशुतोष नाराज झाले होते. गेल्या काही दिवसापासून ते ट्विट करत होते. त्यामध्ये ते निराश आणि दु:खी असल्याचे दिसत होते.

आम आदमी पार्टीसोबत जाणे खुप चांगले होते, क्रांतीकारी होते. मात्र आता त्यांचा अंत झाला आहे. मी आम आदमी पार्टीला राजीनामा दिला असून पीएसीला राजीनामा मंजूर करण्यास देखील सांगितले आहे. काही वैयक्तीक कारणासाठी मी राजीनामा दिला आहे. आम आदमी पार्टी आणि मला साथ दिलेल्या सर्वांचे धन्यवाद. – आशुतोष, माजी आप नेते

आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. “जीवनात एक चांगला मित्र, एक प्रामाणिक माणूस,एक विश्वासी व्यक्तीच्या रुपात आशुतोष यांच्याशी माझे नाते कायम राहिल. त्यांचे पक्षातून अचानक बाहेर पडणे माझ्यासाठी धक्कादायक आहे.”

संवेदनशील पत्रकार म्हणून ओळख

पत्रकार असताना आशुतोष यांना बसपाचे संस्थापक कांशीराम यांनी थोबाडात मारले होते. आशुतोष यांची छाप एक संवेदनशील आणि चांगले पत्रकार म्हणून राहिली होती. त्यांची हिच गंभीरता आणि तत्परता त्यांना आम आदमी पार्टीपर्यंत घेऊन आली होती. अखेर त्यांनी याठिकाणी देखील राजीनामा दिला आहे.

अशुतोष यांच्या राजीनाम्यावर केजरीवाल यांनी देखील ट्विट करुन उत्तर दिले आहे. “आम्ही कसा काय तुमचा राजीनामा स्विकारु? या जन्मात तर नाही” असे अरविंद केजरीवाल यांनी ट्वट केले आहे.

First Published on: August 15, 2018 1:30 PM
Exit mobile version