खंडणी प्रकरणी अबू सालेमला ७ वर्षांची शिक्षा

खंडणी प्रकरणी अबू सालेमला ७ वर्षांची शिक्षा

file photo of abu salem

२००२ च्या खंडणीप्रकरणी दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने आज कुख्यात गँगस्टर अबू सालेमला ७ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टात फिर्यादीच्या आणि आरोपीच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने सालेमला शिक्षा सुनावली. २६ मे रोजी सालेमला या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. तर इतर आरोपी माजिद खान, चंचल मेहता, पवन कुमार मित्तल, मोहम्मद अश्रफ यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

काय आहे खंडणी प्रकरण
२००२ मध्ये दक्षिण दिल्लीत ग्रेटर कैलाश भागात राहणारे व्यावसायिक अशोक गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी अबू सालेमविरोधात ग्रेटर कैलासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे सध्या आर्थर रोड येथील मुंबई मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या सालेमच्या शिक्षेत आणखी वाढ झाली आहे.

कुख्यात गँगस्टर अबू सालेमबाबत
मुंबईत १९९३मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरण तसेच १९९५ मध्ये बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्या प्रकरणात सालेम दोषी असून सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दोन्ही प्रकरणात सालेमवर दोषी सिद्ध झाले असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सालेमच्या अटकेपूर्वी भारत आणि पोर्तुगालमध्ये प्रत्यार्पण करार झाला होता. त्यानंतर जेव्हा सालेमला भारतात आणण्यात आले होते. त्यावेळी लिस्बन न्यायालयाने सालेमला फाशीची शिक्षा देता येणार नाही. या आधारे प्रत्यार्पण केले होते. सालेमला फाशीची शिक्षा किंवा २५ वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा न देण्यास सरकारने मान्य केले होते.

First Published on: June 7, 2018 11:27 AM
Exit mobile version