अखेर अदानी समूहाचा एफपीओ रद्द; गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार

अखेर अदानी समूहाचा एफपीओ रद्द; गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार

संग्रहित छायाचित्र

मुंबईः केंद्रीय अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात तेजीमुळे उत्साह कायम असतानाच अदानी उद्योग समूहाने बुधवारी महत्वाचा निर्णय घेतला. गुंतवणूकदारांचे पैसै परत करण्यासाठी अदानी एंटरप्रायझेसने २० हजार कोटी रुपये मुल्याचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत अदानी समुहाने परिपत्रक जारी करत बुधवारी रात्री ही माहिती दिली आहे. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात घेत कंपनीने एफपीओची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण यामार्फत अदानी समुहाने दिले आहे. तसेच पूर्ण झालेले व्यवहार मागे घेतले जात आहेत. आपल्या गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन एफपीओ मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे अदानी समुहाने परिपत्रकात नमूद केले आहे.

अदानी समुहाने नुकताच अदानी एंटरप्राइजेजचा एफपीओ जारी केला होता. ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याची संधी दिली होती, पण कंपनीने एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या संचालक मंडळाची बुधवारी बैठक झाली, कंपनीमधील सदस्यांच्या हितासाठी एफपीओ बंद करण्याचा निर्णय घेतला. अदानी समुहाकडून गुंतवणूकधारकांना पैसे परत दिले जाणार आहेत.

अमेरिकन फर्म हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाचे शेअर्स धडाधड कोसळले. हिंडेनबर्गने आपल्या अहवालात अदानी समूहावर शेअर बाजारातील हेराफेरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. हिंडेनबर्गच्या अहवालावर प्रतिक्रिया देताना गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने हे आरोप बोगस आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलं आहे. अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर सिंह यांनी हिंडेनबर्ग रिसर्चवर योग्य संशोधन न केल्याचा आणि कॉपी-पेस्ट केल्याचा आरोप केला आहे. त्यात असंही म्हटले आहे की, त्यांनी एकतर योग्य संशोधन केलं नाही किंवा योग्य संशोधन केलं पण लोकांची दिशाभूल केली आहे.

अदानी समुहाचा एफपीओ येण्याआधी हिंडेनबर्गचा अहवाल आला होता. त्यामुळे अदानी समुहाच्या गुंतवणुकीवर याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात होते.

हिंडेनबर्गने नुकताच हा अहवाल प्रकाशित केला. अदानी समूह अनेक दशकांपासून स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाउंटिंगच्या फसवणुकीच्या नियोजनात गुंतलेला आहे. फर्मने अहवालात दावा केला आहे की त्यांनी समूहाच्या माजी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डझनभर व्यक्तींशी बोलले आहेत. हजारो दस्तऐवजांची समिक्षा केली आहे आणि सुमारे अर्धा डझन देशांमध्ये उद्योगांच्या साइटला भेट देण्यात आली आहे.

First Published on: February 1, 2023 11:27 PM
Exit mobile version