अडवाणींकडे कारगिल युद्धाची माहिती होती

अडवाणींकडे कारगिल युद्धाची माहिती होती

वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी

कारगिल युद्ध होणार हे तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना माहिती देण्यात आली होती. मात्र युद्धाचे खापर गुप्तचर यंत्रणेवर फोडण्यात आले, असा गौप्यस्फोट रॉ या गुप्तचर संस्थेचे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुलत यांनी केला आहे. आता रॉच्या माजी प्रमुखांनीच त्यावर भाष्य केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची चिन्हे आहेत. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्यावेळी दुलत हे रॉमध्ये होते. शनिवारी चंदीगडमध्ये सैन्य साहित्य महोत्सवाला संबोधित करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या कार्यक्रमाला निवृत्त लेफ्टनंट जनरल कमल डावर, रॉचे माजी प्रमुख के. सी. वर्मा आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजीव लंगर उपस्थित होते. या तिघांनीही दुलत यांच्या मताशी सहमती दर्शवत गुप्त माहिती जास्त काळ ठेवून चालत नाही. त्यावर त्वरित योग्य कारवाही व्हायला हवी, असे स्पष्ट केले.

तसंच भारतीय व्यवस्थेत सर्व गुप्तचर यंत्रणांची सूत्रे एखाद्या व्यक्तिच्या हाती असणं आत्मघाती ठरू शकतं, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाक लष्कराच्या हातचे बाहुले आहेत काय? असा सवाल दुलत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी इम्रान यांना आपण अजून वेळ दिला पाहिजे, असं मत व्यक्त केलं. कारगिल युद्धापूर्वी काही संदिग्ध हालचालींची आम्हाला माहिती मिळाली होती. त्यावर भाष्य करत आम्ही ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवली होती. युद्धापूर्वीच आम्ही अडवाणींना ही माहिती दिली होती, असे दुगल म्हणाले. जम्मू-काश्मीर आणि उत्तर-पूर्वमध्ये रोज होणारे ऑपरेशन केवळ ३० टक्के गुप्त माहितीच्या आधारे होतात. कोणीही संपूर्ण गुप्त माहिती येईपर्यंत थांबू शकत नाही, असे लंगर यांनी सांगितले. तर प्रत्येक अपयशाचे खापर गुप्तचर यंत्रणांवर सोडून चालणार नाही, हे व्यवस्थेचं अपयश असतं,’असे डावर यांनी स्पष्ट केले.

First Published on: December 10, 2018 5:46 AM
Exit mobile version