50 वर्षांनंतर ‘हा’ स्वदेशी ब्रँड पुन्हा बाजारात, रिलायन्स ग्रुपने केला लॉन्च

मुंबई : कोला सेगमेंटमधील ‘कॅम्पा’ हा स्वदेशी ब्रँड स्पार्कलिंग बेव्हरेज श्रेणीतील भारताचा स्वतःचा ब्रँड आहे. एवढ्या वर्षानंतर मुकेश अंबानींच्या लायन्स कंपनीने हा ब्रँड ताब्यात घेऊन त्याला पुनरुज्जीवित केले आहे. रिलायन्सने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत कॅम्पा लॉन्च करण्याची घोषणा केली असून याअंतर्गत तीन पेये सुरू करण्यात आली आहेत.

रिलायन्स समूहाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ची पूर्ण मालकीची उपकंपनी, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने कॅम्पा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. सुरुवातीला, कॅम्पा पोर्टफोलिओ अंतर्गत कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज ही तीन पेये लॉन्च केली जातील. या ब्रँडचे लाँचिंग देशांतर्गत भारतीय ब्रँडला प्रोत्साहन देण्याच्या धोरणानुसार आहे.

लॉन्च प्रसंगी बोलतांना, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले की, “कॅम्पा नवीन अवतारात सादर करून आम्ही ग्राहकांच्या पिढ्यानपिढ्या या प्रतिष्ठित ब्रँडचा अवलंब करण्यास आणि शीतपेय क्षेत्रात उत्साहाची नवीन लाट निर्माण करण्यास प्रेरित करू अशी आशा करतो. कुटुंबातील वृद्ध सदस्यांकडे मूळ कॅम्पाच्या गोड आठवणी असतील आणि ते ब्रँडशी संबंधित जुन्या आठवणी जपतील. तर, तरुण ग्राहकांना नवीन ताजी चव आवडेल. झपाट्याने विकसित होत असलेल्या भारतीय बाजारपेठेने उपभोगाच्या अधिक संधी उपलब्ध करून दिल्याने, आमचा एफएमसीजी व्यवसाय विस्तारण्याचे आणखी एक धाडसी पाऊल उचलले आहे. कॅम्पा परत आणण्यासाठी आम्ही खरोखरच खूप उत्साहित आहोत.

कॅम्पा पाच आकारांच्या पॅकमध्ये
“द ग्रेट इंडियन टेस्ट” च्या कॅम्पा रेंज अंतर्गत पाच पॅकच्या आकारामध्ये उपलब्ध होणार आहे. पहिला आकार तात्काळ वापराचा पॅक आहे. ज्यामध्ये 200 मिली कोला असेल. दुसरा 500ml आणि 600ml चा ऑन-द-गो शेअरिंग पॅक आहे. याशिवाय एक लिटर आणि दोन लिटरचे होम पॅकही लाँच करण्यात आले आहेत. या लॉन्चसह, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने त्याचा एफएमसीजी पोर्टफोलिओ आणखी मजबूत केला आहे. यामध्ये हेरिटेज ब्रँड सोस्यो हजूरी, कन्फेक्शनरी रेंजमधील लोटस चॉकलेट्स, मालिबन, श्रीलंकेचा आघाडीचा बिस्किट ब्रँड मालिबन तसेच इंडिपेंडन्स आणि गुड लाइफसह स्वतःच्या ब्रँड अंतर्गत दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.

दिल्लीत सर्वाधिक पसंतीचे पेय
1977 नंतर सुमारे 15 वर्षे कॅम्पा कोला दिल्ली आणि आसपासच्या भागातील लोकांचे सर्वाधिक पसंतीचे थंड पेय होते. त्यावेळी देशभरात जवळपास ५० बॉटलिंग प्लांट होते. त्यापैकी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील कारखाना सर्वात जुना आणि प्रसिद्ध होता. कंपनीचा दिल्लीतील मोतीनगर कारखानाच सर्वात मोठा होता. कंपनीचे दिल्लीत आणखी दोन बॉटलिंग प्लांट होते. एक नजफगडमध्ये आणि दुसरा ओखलामध्ये. हे सर्व हळूहळू बंद पडले. आता रिलायन्सने कॅम्पा विकत घेतला आहे.

First Published on: March 9, 2023 6:07 PM
Exit mobile version