कोरोनानंतर खोस्ता-२ ची दहशत, मानवी पेशी पोखरणारा विषाणू ठरणार प्राणघातक; शास्त्रज्ञांचा धोक्याचा इशारा

कोरोनानंतर खोस्ता-२ ची दहशत, मानवी पेशी पोखरणारा विषाणू ठरणार प्राणघातक; शास्त्रज्ञांचा धोक्याचा इशारा

मुंबई –  कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असतानाच जगावर आणखी एका विषाणूचा धोका संभावत आहे. आता संशोधकांना रशियन वटवाघळांमध्ये खोस्ता-2 नावाचा नवा विषाणू सापडला आहे. हा विषाणू SARS-CoV-2 व्हायरससारखाच आहे. हा विषाणू मानवी पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतो, त्यामुळे मानवी शरीरात संसर्गाचा धोका अधिक आहे. तसंच, अद्याप या विषाणूविरोधात लस आली नसल्याने चिंता व्यक्त केली जातेय. दिलासादायक म्हणजे, या विषाणूचं संशोधन समोर आलं असलं तरीही याची लागण अद्यापही कोणालाही झालेली नाही.

रशियातील क्लोज पॅझोजेन्स या जर्नलमध्ये या संशोधाविषयी माहिती प्रकाशित झाली आहे. खोस्ता-२ हा विषाणू वटवाघुळ, पँगोलिन, कुत्रे आणि डुक्र या वन्य प्राण्यांमध्ये आढळून येतोय. कोरोनाबद्दल संशोधन करताना या विषाणूची माहिती झाली होती. मात्र, शास्त्रज्ञांनी या विषाणूला गांभीर्याने घेतलं नाही. परंतु आता पुन्हा नव्याने संशोधन झालं. या संशोधनातून असं सिद्ध झालंय की, खोस्ता-२ व्हायरस मानवांतही संक्रमित होऊ शकतो. तसंच, खोस्ता-२ आणि कोरोना व्हायरस एकाच वर्गातील विषाणू आहेत. हा विषाणूदेखील शरीरातील पेशींवर हल्ला करतो. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येतेय.

महत्त्वाचं म्हणजे कोरोना प्रतिबंधक लस या विषाणूवर प्रभावी ठरत नाही. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांनाही या विषाणूचा धोका आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने लस निर्मिती आणि औषध शोधावे लागणार आहेत.

कसा पसरतो ‘खोस्ता-२’?

वाटवाघूळ, पँगोलिन, रॅकून आणि कुत्रे यांसारख्या वन्य प्राण्यांमधून या विषाणूचा प्रसार होतो. मात्र, या विषाणूची लागण झालेलं एकही प्रकरण अद्याप नोंदवण्यात आलेलं नाही. मात्र, भविष्यात हा विषाणूही कोरोनासारखं महामारीचं रुप धारण करू शकतो, असं मायकेल लेटको यांनी सांगितलं. तसंच, हा विषाणू मानवापर्यंत पोहोचला तर प्राणघातक ठरू शकतो.

लस निर्मिती सुरू

या विषाणूविरोधात लढण्यासाठी शास्त्रज्ञांनी लस तयार करण्यास सुरुवात केली आहे. SARS-CoV-2 आणि संबंधित इतर व्हायरसपासून संरक्षण करणारी अशी लस तयार करण्यात येत आहे जी खोस्ता-२ विरोधातही प्रभावी ठरेल.

First Published on: September 29, 2022 12:00 PM
Exit mobile version