‘रामायण’ नंतर आता ‘महाभारत’ही पुन्हा दाखवणार; ‘शक्तिमान’ही आहे जोरात

‘रामायण’ नंतर आता ‘महाभारत’ही पुन्हा दाखवणार; ‘शक्तिमान’ही आहे जोरात

रामायण नंतर आता महाभारतही प्रक्षेपित होणार

करोना व्हायरसचे संक्रमन रोखण्यासाठी देशात १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात लोकांनी घरीच थांबावे, त्यांचे घरातच मनोरंजन व्हावे, यासाठी ८० दशकातील सगळ्यात लोकप्रिय असलेला रामानंद सागर यांची रामायण ही मालिका टीव्हीवर पुन्हा टेलिकास्ट केली जाणार आहे. ४० पुढे असणाऱ्या आजच्या पिढीला आजही रामायण म्हटले की तो काळ लख्ख आठवतो. त्यानंतर ३० ते ३५ वयोगटात असणाऱ्या पिढीनेही त्यांच्या बालपणातील दोन मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण करण्याची मागणी रेटली आहे. बी.आर. चोप्रा यांचे महाभारत आणि मुकेश खन्ना अभिनित शक्तिमान मालिका पुन्हा दाखवावी अशी मागणी आता होत आहे. त्यात महाभारताची मागणी यशस्वी झाली आहे.

रामायण मालिका पुन्हा दाखविणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर ट्विटरवर #Mahabharat ट्रेडिंगमध्ये आले. लोकांचे म्हणणे आहे की, रामायण नंतर महाभारत देखील दाखवले जावे. आम्हाला महाभारत खूप आवडले होते. कृपया सरकारने तेही दाखविण्याचा विचार करावा, असे काही युजर्स म्हटले होते. त्यावर आता महाभारत दाखविण्याचा विचार झाला असून महाभार रोज दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवले जाणार आहे.

महाभारतासोबतच काही नेटीझन्सना शक्तिमान ही मालिका पाहायची आहे. आज जे ३० किंवा ३५ वयोगटात आहेत, त्यांनी शाळेत असताना ही मालिका पाहीली होती. आता त्यांच्या मुलांनी ही मालिका पहावी, अशी त्यांची इच्छा आहे. कारण घरात बसलेल्या मुलांचे देखील मनोरंजन होईल. यासोबतच काहींनी शेखर सुमन यांच्या लोकप्रिय शो देख भाई देख सुद्धा पुन्हा दाखवला जावा, अशी मागणी केली आहे.

काही लोकांनी तर यावर मिम्स बनवायला सुरुवात केली आहे. एका युजरने दंगल सिनेमाचा एक सिन एडिट केला आहे. यामध्ये आमिर खानच्या चेहऱ्याला दुरदर्शनचा लोगो लावला आहे, तर आमिरने ज्या पैलवानाला हरवले त्याचा नेटप्लिक्सचा लोगो लावला आहे. त्याला आमिर खानचा डायलॉग लावून भन्नाट मिम्स बनवलं आहे.

ट्विटरवर सध्या प्रकाश जावडेकर यांना टॅग करुन आपापल्या आवडीच्या मालिका दाखविण्याची विनंती केली जात आहे. रामायण मालिकेचा पहिला भाग २८ मार्च रोजी टेलिकास्ट केला जाणार आहे. सकाळी ९ ते १० दरम्यान एक एपिसोड आणि रात्री ९ ते १० मध्ये त्याच्या पुढचा एपिसोड रोज दाखविण्यात येणार आहे.

First Published on: March 27, 2020 11:40 PM
Exit mobile version