मागच्या दरवाजाने सरकार बनवणार्‍यांना जनतेने धडा शिकविला

मागच्या दरवाजाने सरकार बनवणार्‍यांना जनतेने धडा शिकविला

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जनतेचा कौल नाकारून मागच्या दरवाजाने सरकार स्थापन करणार्‍यांना लोकांनी धडा शिकविला. लोकशाही पद्धतीने जनतेने त्यांचे कटकारस्थान उद्ध्वस्त केले,असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीत कर्नाटक पोटनिवडणुकीचा दाखला देत विरोधकांना टोला लगावला आहे.महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेेनेवर देखील शरसंधान साधले आहे.

पोटनिवडणुकीत भाजप सरकार राहणार की जाणार असा प्रश्न केला जात होता. त्याला जनतेने उत्तर दिले आहे असे मोदींनी म्हटले आहे. तसेच काँग्रेसने कर्नाटकात भाजपला सरकार बनवू दिले नाही, त्यांना जनतेने शिक्षा दिली. कर्नाटकात जनतेच्या जनादेशाचा विजय झाला आहे. काँग्रेस आता लोकांची विश्वासघात करु शकणार नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला असेल की जर कोणी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला तर संधी मिळताच जनता त्यांना शिक्षा देते. जनतेने भाजपला नवी ताकद दिली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानत शिवसेनेवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

अनपेक्षितरित्या कमळ फुलले

झारखंडमधील बरही याठिकाणी प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, दक्षिण भारतात भाजप कमकुवत आहे असे बोलले जात होते. पोटनिवडणुकीच्या या १५ जागेवर गेल्या ७० वर्षांपासून भाजपचा विजय झाला नव्हता. मात्र, गद्दारांना धडा शिकविण्यासाठी जनतेने त्याठिकाणी भाजपचे कमळ फुलविले. काँग्रेस कधीही आघाडी धर्माचे पालन करत नाही, भ्रष्टाचारासाठी काँग्रेस कोणत्याही मर्यादा पार करु शकते. झारखंडच्या जनतेने कर्नाटकच्या निकाल लक्षात ठेवावा, अशा शब्दांत काँग्रेसवर टीका केली आहे.

First Published on: December 10, 2019 5:30 AM
Exit mobile version