कर्नाटक विजयानंतर ममतांचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी, पण…

कर्नाटक विजयानंतर ममतांचा सूर बदलला; काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी, पण…

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये सत्तांतर घडवून काँग्रेसने तब्बल 136 जागा जिंकल्या. काँग्रेसला तिथे स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बाबतीत अन्य विरोधकांची भूमिका देखील आता मवाळ झाली आहे. त्यात तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सूरही बदलल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कालपर्यंत काँग्रेसपासून चार हात लांब राहण्याचेच धोरण अवलंबले होते. पण आता 2024च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवतानाच त्यांनी एक अटही ठेवली आहे.

भाजपाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न बिहारचे जदयू नेते आणि मुख्यमंत्री नितीश कुमार, समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर अर्थात के. चंद्रशेखर राव यांच्याकडून सुरू आहेत. पण तृणमूल काँग्रेससह काही राजकीय पक्ष काँग्रेसपासून दूर राहण्याच्या विचारात आहेत. पण आता पहिल्यांदाच ममता बॅनर्जी यांनी, विरोधकांची एकजूट होण्याच्या संभाव्य रणनीतीबाबत तृणमूल काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

पश्चिम बंगाल राज्य सचिवालयात ममता बॅनर्जी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. जिथे काँग्रेस मजबूत असेल तिथे त्यांनी लढले पाहिजे. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. त्यात काहीही गैर नाही. मात्र, काँग्रेसनेही इतर पक्षांनाही साथ द्यायला हवी. तसेच त्यांनी पश्चिम बंगालमध्ये आमच्याविरोधात लढू नये, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे स्थानिक पक्षांचे प्राबल्य आहे, तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी कर्नाटकातील जनतेला भाजपाची सत्ता गेल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. पण त्याचबरोबर काँग्रेसचा उल्लेख करण्याचे देखील त्यांनी टाळले.

तृणमूल आणि काँग्रेसमध्ये रंगला होता कलगीतुरा
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये मोदी सरकारबाबत केलेल्या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक झाली होती. संसद अधिवेशनातही हा मुद्दा भाजपाने लावून धरला होता. त्यावरून ममता बॅनर्जी यांनी भाजपासह काँग्रेसवर टीका केली होती. ज्वलंत मुद्द्यांवरून सर्वांचे लक्ष हटवण्यासाठी भाजपा राहुल गांधी यांना ‘हीरो’ बनविण्याचा प्रयत्न करत आहे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते राहिले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणीही टार्गेट करू शकणार नाही, असा आरोप त्यांनी केला होता.
यावर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात डील झाली आहे. राहुल गांधी यांना बदनाम करण्यासाठी ही डील झाली आहे. ममता बॅनर्जी या पंतप्रधान मोदी यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. त्यामुळेच त्या कॉंग्रेसविरोधी भाष्य करत असल्याचा पलटवार काँग्रेसने केला होता.

First Published on: May 15, 2023 10:05 PM
Exit mobile version