शेतकऱ्यांचे आंदोलन: गाझीपूर सीमेपासून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात

शेतकऱ्यांचे आंदोलन: गाझीपूर सीमेपासून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेले ४३ दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारशी चर्चा करुनही अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज आंदोलन केले आहे. शेतकरी आज दिल्लीच्या सीमारेषा आणि द्रुतगती मार्गावर ट्रॅक्टर मोर्चे काढत असून गाझीपूर सीमेवरुन शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली आहे.

सीमेवर शेतकरी दाखल

पंजाबमधील शेतकरी मोर्चासाठी ट्रॅक्टर घेऊन सीमेवर दाखल झाले आहेत. या मोर्चामध्ये हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांचा सहभाग आहे. दरम्यान, गाझीपूर सीमेपासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात केली आहे.

सुरक्षा दल तैनात

सिंहू सीमेवर शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च पाहता सीमेवर मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. सिंहू सीमेवर शेतकऱ्यांचा निषेध सुरु असून येत्या ८ जानेवारी रोजी शेतकरी आणि सरकार यांच्यात आठव्या फेरीची चर्चा होणार आहे.

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मेळावा

२६ जानेवारीसाठी ट्रॅक्टर मेळावा सज्ज झाला आहे. आमचा रस्ता सीमे इथून डासनाकडे जाईल. त्यानंतर आपण अलीगड रोड येथे थांबू. मग तेथून परत येऊ. आम्ही सरकारला पटवून देण्यासाठी हे करत आहोत. – राकेश टिकैत; भारतीय किसान युनियन प्रवक्ते

राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं?

‘शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय? का इथं आंदोलनं होत आहेत? ही राजकीय आंदोलनं आहेत. यात समेट होईल असं मला वाटत नाही. राहुल गांधींना शेतीमधलं काय कळतं? ते शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा गोष्टी करतात’, अशा शब्दांमध्ये भाजापा नेते नारायण राणे यांनी आज कणकवली येथून काँग्रेस नेते राहुल गांधी व कृषी कायद्यास विरोध करणाऱ्यांवर तोफ डागली आहे.


हेही वाचा – अमेरिका हिंसाचार: ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामने ट्रम्प यांचं अकाऊंट केलं ब्लॉक


 

First Published on: January 7, 2021 12:56 PM
Exit mobile version