एअर इंडिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, अव्यवस्थेबाबत भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचे ट्वीट

एअर इंडिया पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, अव्यवस्थेबाबत भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांचे ट्वीट

संग्रहित

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून विमानसेवा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. त्यातही एअर इंडियाला विविध वादांना सामोरे जावे लागत आहे. त्यात आणखी एका वादाची भर पडली आहे. भाजपा नेत्या खुशबू सुंदर यांनी ट्वीट करून एअर इंडियाच्या व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. एअर इंडियाच्या खराब व्यवस्थेमुळे एका जखमी प्रवाशाला सुमारे 30 मिनिटे व्हीलचेअरसाठी प्रतीक्षा करावी लागली, असे खुशबू सुंदर यांनी म्हटले आहे.

प्रिय, एअर इंडिया तुमच्याकडे जखमी प्रवाशाला घेऊन जाण्यासाठी व्हीलचेअर देखील नाही. चेन्नई विमानतळावर सुमारे 30 मिनिटे या प्रवाशाला वाट पाहात थांबावे लागले. त्यानंतर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या विमान कंपनीकडून व्हीलचेअरची व्यवस्था केली. मला खात्री आहे की तुम्ही आणखी चांगली सेवा देऊ शकता, असे ट्वीट खुशबू सुंदर यांनी केले आहे.

एअर इंडियाने मागितली माफी
एअर इंडियाने खुशबू सुंदरच्या ट्वीटची दखल घेतली आहे. खुशबू सुंदरचे ट्वीट रीट्वीट करून एअर इंडियाची माफी मागितली. आमच्यासोबतच्या अनुभवाबद्दल तुमच्याकडून जाणून घेतले आणि त्याबद्दल आम्हाला खूप वाईट वाटत आहे. आम्ही आमच्या चेन्नई विमानतळ टीमशी याबाबत चर्चा करत आहोत, असे एअर इंडियाने म्हटले आहे.

डीजीसीआयने यापूर्वी ठोठावला 10 लाखांचा दंड
यापूर्वी, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला 6 डिसेंबर 2023च्या एका घटनेसाठी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. एअर इंडियाच्या पॅरिस-दिल्ली फ्लाइटमध्ये एका मद्यधुंद प्रवासी शौचालयात धुम्रपान करत होता. तर दुसरा प्रवासी महिलेच्या आसनावर बसला होता. याची माहिती न दिल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.

First Published on: January 31, 2023 1:27 PM
Exit mobile version