विमानाचा दरवाजा खोलणारा ‘तो’ प्रवासी तेजस्वी सूर्या?; विरोधकांनी केली टीका

विमानाचा दरवाजा खोलणारा ‘तो’ प्रवासी तेजस्वी सूर्या?; विरोधकांनी केली टीका

चेन्नईः गेल्या महिन्यात चन्नई विमानतळावर एका प्रवाशाच्या चुकीमुळे विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला गेला होता. ही गंभीर चुक करणारा प्रवासी भाजपचे खासदार तेजस्वी सुर्या असल्याची माहिती सुत्रांचा दाखला देत समोर आली आहे. विरोधकांनी या घटनेवरून टीका केली आहे. खासदार सुर्या व त्यांच्या कार्यालयाने याबाबत माहिती दिलेली नाही.

चेन्नई विमानतळावर गेल्या महिन्यात इंडिगो विमानाचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला गेला. एका प्रवाशाच्या चुकीमुळे हा दरवाजा उघडला गेला होता. विमानाचे उड्डाण तत्काळ थांबवण्यात आले. अभियंत्याने तपासणी केल्यानंतर विमानाने उड्डाण घेतले. विमान प्रवासाला उशिर झाला होता. या घटनेबाबत त्या प्रवाशाने माफी मागितली व त्याची माफी मान्य करण्यात आली. या गंभीर चुकीसाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. केवळ माफीवर कारवाईला पूर्णविराम कसा, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

याबाबत एका वृत्तवाहिनीने कर्नाटकमधील भाजपचे खासदार सुर्या यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. खासदार सुर्या व त्यांच्या कार्यालयाने या घटनेबाबत काहीच खुलासा केलेला नाही. ही घटना गेल्या महिन्यात १० डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. चेन्नई येथून तिरुचिरापल्लीसाठी इंडिगोचे विमान उड्डाण घेते होते. त्यावेळी एका प्रवाशाच्या चुकीमुळे आपत्कालीन दरवाजा अचानक उघडला गेला. त्या प्रवाशाचा हात दरवाजावर पडला. दरवाजाचे टाळे अचानक उघडले गेले. प्रवाशाने याबाबत तत्काळ माफी मागितली. त्यानंतर अभियंत्याने विमानाची तपासणी केली. यामुळे विमान प्रवासाला उशिर झाला होता, अशी माहिती इंडिगो प्रशासनाने दिली.

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. प्रवाशाच्या चुकीमुळे आपत्कालीन दरवाजा उघडला गेला. याची माहिती मिळताच लगेचच उड्डाण थांबवण्यात आले. विमानाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर विमानाने उड्डाण घेतले, अशी माहिती डीजीसीआयने दिली.

चेन्नई विमानतळाच्या सुत्रांनुसार, विमानात तेजस्वी सुर्या होते. त्यांच्या सोबत भाजपचे प्रमुख अन्नामलाई होते. त्यामुळे चुक करणाऱ्या त्या प्रवाशाचे नाव विमानतळ प्रशासन उघड का करत नाही. याची चौकशी का करत नाहीत, असे प्रश्न कॉंग्रेसने उपस्थितीत केले आहेत. विमान उड्डाण घेत असताना अचानक थांबवण्यात आले. अशा गंभीर घटनेसाठी केवळ माफी योग्य ठरेल का, अशी पोस्ट शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सोशल मिडियावर लिहिली आहे.

 

First Published on: January 18, 2023 2:56 PM
Exit mobile version