लखीमपूर हिंसाचारावरून गृहराज्यमंत्री मिश्रांची पत्रकाराला शिवीगाळ

लखीमपूर हिंसाचारावरून गृहराज्यमंत्री मिश्रांची पत्रकाराला शिवीगाळ

अजय मिश्रा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. लखीमपूर हिंसाचार प्रकरणात पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर अजय मिश्रा यांनी त्या पत्रकाराला शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लखीमपूर खीरी हिंसाचार प्रकरणी एका टीव्ही चॅनेलच्या पत्रकाराने जेव्हा मंत्र्यांना एसआयटी तपासाबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते भडकले आणि शिवीगाळ केली.

मिश्रा यांनी टीव्हीच्या पत्रकाराला भीती दाखवण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका पत्रकाराचा मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळी टेनी म्हणाले की, ‘मुर्खासारखे प्रश्न विचारत जाऊ नका, डोकं बिघडलं आहे काय?’ त्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केला. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय टेनीचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. यावरून विरोधकांकडून सातत्याने अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, लोकसभेत लखीमपूर हिंसाचार प्रकरणावरून विरोधी पक्षांनी लोकसभेत प्रचंड गदारोळ केला. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. त्यानंतरही लोकसभेत गोंधळ सुरूच राहिल्याने कामगार गुरुवार सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. लखीमपूर हत्याकांड प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला होता.

First Published on: December 16, 2021 6:20 AM
Exit mobile version