जम्मू-काश्मीर : सीमाभागात ड्रोनच्या मदतीने पाठवली जाताहेत शस्त्रे; AK-47 सह पिस्तूल जप्त

जम्मू-काश्मीर : सीमाभागात ड्रोनच्या मदतीने पाठवली जाताहेत शस्त्रे; AK-47 सह पिस्तूल जप्त

जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागात ड्रोनच्या मदतीने शस्त्रास्त्रे पाठवली जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या अखनूर पोलिसांनी आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने नायवला खादच्या सीमावर्ती भागात ड्रोनच्या मदतीने टाकलेली पाकिटे जप्त केली आहेत. या पॅकेट्समधून पोलिसांनी दोन AK-47 असॉल्ट रायफल, तीन AK मॅगझीन, ७.६२ च्या ९० गोळ्या आणि एक स्टार पिस्तूल जप्त केलं आहे. गेले काही दिवस पाकिस्तान जम्मू-काश्मीरच्या सीमावर्ती भागात घुसखोरीसह दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत आहे.

पाकिस्तानकडून सोमवारी एलओसीवर पालनवाला सेक्टरमधील केरी, बट्टल आणि बारडोह भागात सैन्य आणि सीमेजवळील भागात गोळीबार केला. यामध्ये कोणतीही हाणी झाली नाही. यामुळे सीमावर्ती भागातील लोक घाबरले आहेत. कारण या गोळीबाराचा १५ कि.मी. प्रयंत आवाज गेला. प्रत्युत्तरात पाकिस्तानला लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. सायंकाळी साडेचारच्या सुमारास गोळीबार सुरू झाला होता तो सायंकाळी सात पर्यंत सुरू होता.

दरम्यान, राजोरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या सीमा भागात सोमवारी सायंकाळी उशिरा पाकिस्तानी सैन्याने सैन्य दलावर गोळीबार केला. या गोळीबाराला लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. यात कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने दुपारी साडेपाचच्या सुमारास सुंदरबनी सेक्टरच्या दादल, माला, मिनका येथे सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार केला.

 

First Published on: September 22, 2020 5:51 PM
Exit mobile version