परीक्षेसाठी अख्खं अल्जिरिया गेलं ऑफलाईन!

परीक्षेसाठी अख्खं अल्जिरिया गेलं ऑफलाईन!

बुधवारी संपूर्ण अल्जिरिया राष्ट्र ऑफलाईन गेले. कारण आहे अल्जिरियामध्ये सुरू असलेल्या शालांत परीक्षा! या परीक्षांमुळे संपूर्ण देशाची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कॉपी करु नये यासाठी अल्जिरिया सरकारने हा निर्णय घेतला आहे. अल्जिरियामध्ये माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेसाठी जवळपास ७ लाख विद्यार्थी बसले आहेत. २० जून ते २५ जूनपर्यंत ही परीक्षा होणार असून २२ जुलैला निकाल लागणार आहे.

गेल्यावर्षी पेपर झाला होता लीक

२०१६ मध्ये पेपर लीक झाल्याचे प्रकरण घडले होते. शालांत परीक्षा सुरु होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका इंटरनेटवर लीक झाली होती. परिणामी, संबंधित अधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना ही सेवा थांबवण्याचे आदेश दिले होते.

शिक्षणमंत्र्यांनी घेतला निर्णय

दरम्यान, अल्जिरियाचे शिक्षण मंत्री नुरीया बेनगाब्रिट यांनी अल्जिरियाच्या एका प्रसिद्ध वृत्तपत्राला सांगितले की, या संपूर्ण कालावधीत फेसबुक संपूर्ण देशभरात ब्लॉक करण्यात आलं आहे. पेपर लीक प्रकरणात आम्ही निष्काळजीपणा दाखवू शकत नसल्यामुळे हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला असल्याचे नुरीया यांनी म्हटले आहे.

२००० परीक्षा हॉलमध्ये इंटरनेटवर बंदी

अल्जिरियातील विद्यार्थ्यांसह शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणासह इंटरनेट वापरावर बंदी घातली आहे. जवळपास २००० परीक्षा हॉलमध्ये ही बंदी घालण्यात आली आहे. पेपर प्रिंटिंगवेळी पेपर लीक होऊ नये यासाठी देखील काळजी घेण्यात आली आहे. पेपर प्रिंटिंग प्रक्रियेवर पाळत ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसंच त्या ठिकाणावर मोबाईल फोन जॅमर्सही लावण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातही लागू शकते का बंदी?

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातही अशा प्रकारे पेपर लीकची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामध्ये इंटरनेटवर, व्हॉट्सअॅपवर पेपर फुटण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी इथेही इंटरनेटवर बंदी घालता येऊ शकते का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

First Published on: June 21, 2018 3:42 PM
Exit mobile version