स्पर्धा परिक्षेला बसलेले सर्वच उमेदवार अनुत्तीर्ण

स्पर्धा परिक्षेला बसलेले सर्वच उमेदवार अनुत्तीर्ण

प्रतिनिधिक फोटो

गोवा राज्य सरकारव्दारे आयोजित केलेल्या स्पर्धा परिक्षेतील सर्वच उमेदवार अनुतीर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. ही स्पर्धा परिक्षा सरकारी नोकरीतील लेखापाल पदासाठी घेण्यात आली होती. लेखापालच्या ८० जागांसाठी तब्बल १० हजारहून अधिक अर्ज प्रशासनाला मिळाले होते. मात्र, या परिक्षेला बसलेला एकही उमेदवार परिक्षेत उत्तीर्ण होऊ शकला नाही. काही महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या परिक्षेचे निकाल मंगळवारी घोषित करण्या आल्यानंतर ही माहिती उघडकीस आली. स्पर्धा परिक्षेच्या या निर्णयावर उमेदवारांनी प्रश्न उपस्थीत केले आहेत. परिक्षेला बसलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार उत्तीर्ण न झाल्यामुळे आता ही परिक्षा पून्हा घेण्यात येणार आहे.

८० जागांसाठी १० हजार ८१५ अर्ज

गोवा सरकारने एक जानेवारी रोजी ही परिक्षा घेतली होती. प्रशासकीय विभागात ८० लेखापालाच्या जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. अर्ज करणाऱ्यांपैकी १० हजार ८१५ उमेदवारांनी लेखी परिक्षा दिली होती. या परिक्षेत ४३ जागा खुल्यावर्गासाठी, २१ जागा मागास वर्गींयासाठी, ९ जागा भटक्या जमातीसाठी,२ जागा स्वातंत्र सैनिकांच्या पाल्यांसाठी आणि १ जागा माजी सैनिकासाठी होती. वाणिज्य आणि कला क्षेत्रातून गॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा आयोजित करण्यात आली होती.

लेखापाल खात्याचे संचालक प्रकाश परेरा यांनी सांगितले की,”१ जानेवारी २०१८ रोजी घेण्यात आलेल्या परिक्षेला एकही उमेदवार उत्तीर्ण झाला नसल्याचे मी घोषीत करतो. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले गुण उमेदवारांना मिळाले नाहीत. परिक्षेची अवघड पातळी इतर सरकारी परिक्षेसारखीच होती. मात्र तरिही एकही उमेदवार परिक्षा उत्तीर्ण करु शकला नाही.”

दरम्यान या प्रकरणामुळे गोव्यात राजकारणाचा मुद्दा तापला आहे. भाजप हे मुलांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. “सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून सरकार हे मुलांच्या भविष्याशी खेळत आहे. एकही उमेदवार उत्तीर्ण झाला नाही हे कसं शक्य आहे?”- अमरनाथ पणजीकर, काँग्रेस

आप पक्षानेही निशाना साधत सरकारने नोकऱ्या देण्याचे खोटे आश्वासन दिले असल्याचे म्हटलं आहे.

First Published on: August 22, 2018 2:49 PM
Exit mobile version