Corona:सर्व लाईफ इन्शुरन्समध्ये कोरोना कव्हर असणार; लाईफ इन्शुरन्स कौन्सिलचा दिलासा!

Corona:सर्व लाईफ इन्शुरन्समध्ये कोरोना कव्हर असणार; लाईफ इन्शुरन्स कौन्सिलचा दिलासा!

प्रातिनिधीक छायाचित्र

महाराष्ट्रात आणि देशभरात कोरोनाचा फैलाव हळूहळू वाढू लागलेला असतानाच आयुर्विमा असणाऱ्या ग्राहकांना वेगळीच  चिंता सतावू लागली होती. देशात आजघडीला एलआयसीसारख्याच अनेक सरकारी आणि खासगी संस्था जीवन विमा सेवा पुरवतात. मात्र, कोरोना हा आजार अचानक उद्भवला असल्यामुळे या विमा पॉलिसींमध्ये कोरोना कव्हर असणार की नाही? या चिंतेत देशभरातले ग्राहक पडले होते. अनेक ग्राहकांनी या जीवन विमा पुरवणाऱ्या कंपन्यांकडे खुलाशासाठी तगादा लावला होता. यावर अखेर आता इन्शुरन्स कंपन्यांची केंद्रीय संस्था असलेल्या लाईफ इन्शुरन्स कौन्सिलनेच खुलासा करून ग्राहकांना दिलासा दिला आहे. देशभरातल्या खासगी आणि सार्वजनिक अशा सर्व प्रकारच्या संस्थांमध्ये कोरोनामुळे झालेले मृत्यू हे इन्शुरन्समध्ये कव्हर असतील, असं कौन्सिलने स्पष्ट केलं आहे.

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर येणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसी सेटलमेंटचे क्लेम पास करणं हे सर्व विमा कंपन्यांवर बंधनकारक असेल, असं कौन्सिलने बजावलं आहे. तसेच, कोरोनासंदर्भातल्या प्रकरणांना ‘फोर्स मजिऊर’ हे कलम लावता येणार नाही, असं देखील कौन्सिलने विमा कंपन्यांना बजावलं आहे. ‘फोर्स मजिऊर’मध्ये ज्यांचा अंदाज बांधता येत नाही किंवा ज्या आपल्या नियंत्रणात नसतात, अशा घटनांचा समावेश होतो.

कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर त्याचा समावेश विमा कंपन्यांनी काढलेल्या पॉलिसींमध्ये नसेल, अशा प्रकारच्या अफवा पसरू लागल्या होत्या. मात्र, आता त्यावर थेट लाईफ इन्शुरन्स कौन्सिलनेच खुलासा केला आहे. ‘देशातलं लाईफ इन्शुरन्स क्षेत्र देशभरातल्या पॉलिसी धारकांना सेवा पुरवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. क्लेम सेटलमेंटचं काम देखील ऑनलाईन पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे’, अशी प्रतिक्रिया लाईफ इन्शुरन्स कौन्सिलचे मुख्य सचिव एस. एन. भट्टाचार्य यांनी दिली.


Corona: सर्व खासदारांच्या पगारात ३० टक्के कपात! २ वर्षांसाठी खासदारनिधी स्थगित!
First Published on: April 6, 2020 5:46 PM
Exit mobile version