International Yoga Day: ‘कोरोनामुळे वाढलेला एकटेपणा योगाने दूर होईल’

International Yoga Day: ‘कोरोनामुळे वाढलेला एकटेपणा योगाने दूर होईल’

पहाटे उठून योगा करणं शरीरासाठी आणि विशेषत: हृदयासाठी अतिशय लाभदायक ठरतं. अतिशय कठीण आसने करावी असं काही नाही. साधी सोप्पी आसने केली तरी उत्तम !

जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून त्यामुळे लोकांमध्ये एकटेपणा आला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचा सल्ला डब्ल्यूएचओने दिला असल्याने लोकांमध्ये दुरावा वाढला आहे. अशावेळी योगसाधना लोकांना मानसिक आधार देऊ शकेल असे वक्तव्य संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षांनी केले आहे. २१ जून रोजी साजरा होणाऱ्या ६ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांनी हे मत व्यक्त केले. यंदाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामुहिकरीत्या एकत्र न येता डिजिटल पद्धतीने एकत्र येऊन योग दिन साजरा केला जाणार आहे.

महासभेचे अध्यक्ष तिजानी मोहम्मद बंदे यांनी दिलेल्या डिजिटल संदेशमध्ये सांगितले की, कोरोनामुळे जनजीवन अस्थाव्यस्त झाले आहे. सोशल डिस्टन्सिंगमुळे लोकं एकटी पडू लागली आहेत. आर्थिक अडचणींमुळे माणसं चिंतेत आहेत. तसेच आजाराच्या भीतीनेही लोकांमध्ये अस्वस्थता आहे. अशावेळी योग, ध्यानसाधना तुम्हाला तणावमुक्त होण्यास मदत करेल. दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनाला मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊन तो साजरा करत होते. आतापर्यंत भारतातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनाला महत्त्व दर्शवत अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे लोकांना घराबाहेर पडण्यात मनाई केली असून त्यांनी घरात योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे.

जगभरात सध्या ८७ लाख ६६ हजार ०३५ इतकी कोरोनाबाधितांची संख्या झाली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४ लाख ६२ हजारांवर पोहोचली आहे. तसेच ४६ लाख २७ हजार ८८३ रूग्ण बरे झाले आहेत.

हेही वाचा –

WHO चा इशारा: ‘कोविड-19 चा प्रसार वेगाने होतोय, जग धोकादायक टप्प्यावर’

First Published on: June 20, 2020 4:24 PM
Exit mobile version