CoronaEffect: अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या कामगारांवर बंदी; ट्रम्पची घोषणा

CoronaEffect: अमेरिकेत परदेशातून येणाऱ्या कामगारांवर बंदी; ट्रम्पची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

जगातील सत्ताधारी देश म्हणून अमेरिकेची ओळख आहे. मात्र कोरोनाच्या महामारीत अमेरिकेला पुरत जेरीस आणलं आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेत झाल्याचे निदर्शनात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या अनेक संकटांचा सामना करत असून विविध घोषणादेखील करत आहेत. नुकतेच त्यांनी आता परदेशातील लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही, ही महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याबाबतची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प

लॉकडाऊनच्या काळात रोजगारासाठी दुसऱ्या देशातून येणाऱ्या लोकांवर बंदी घालण्यात येत आहे. यामुळे अमेरिकेतील नागरिकांना नोकरीच्या सुविधा उपलब्ध होतील. येथील लोकांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवण्यासाठी हे पाऊल उचलणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच त्यांनी अदृश्य शत्रूकडून वार याचा उल्लेख ट्विटमध्ये करत यामुळे अमेरिकेत कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावावर निर्बंध येतील, असेही म्हटले आहे.

हेही वाचा – अमेरिकेत २ कोटी लोक बेरोजगार; पोट भरण्यासाठी फूड बँकांवर अवलंबून

अमेरिकेची दयनिय अवस्था 

दरम्यान, सध्या अमेरिकेची आर्थिक स्थिती बिघडली असून कोरोनामुळे अमेरिकेतील विविध राज्यात लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे त्यांचे २.२ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. अमेरिकेत कोरोना विषाणूचे आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ९३८ रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत ४२ हजार ५१८ जणांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिकेत लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या लोकांचे दोन वेळच्या जेवणाचेही हाल होत आहेत. परिणामी, नागरिक फूड बॅंकेच्या बाहेर आपला नंबर येण्याची वाट पाहत आहेत. लॉकडाऊन दरम्यान कठोर निर्बंधामुळे लोक अन्न आणि पेय यासाठी देणगीदारांवर अवलंबून आहेत.

First Published on: April 21, 2020 6:17 PM
Exit mobile version