गुटख्यातून डॉलरची तस्करी; कोलकाता कस्टम विभागाची कारवाई

गुटख्यातून डॉलरची तस्करी; कोलकाता कस्टम विभागाची कारवाई

डॉलर्स देण्याचे प्रलोभन देत चालकाची २ लाखांची फसवणूक

कोलकाताः गुटख्याच्या पाकिटातून अमेरिकन डॉलरची तस्करी केली जात असल्याची बाब कोलकाता कस्टम विभागाने कारवाई करुन उघडकीस आणली. गुटख्याच्या प्रत्येक पाकिटात दोन डॉलर होते. असे ४० हजार अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले. त्याची भारतीय किमत ३२ लाख ७८ हजार रुपये आहे.

रविवारी कोलकाता कस्टम अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. ही व्यक्ति बॅंकाॅकला जात होती. त्याने गुटख्याच्या पाकिटात डॉलर ठेवले होते. त्याच्या सामानाची तपासणी करताना त्याच्या बॅगेतील वस्तूंवर कस्टम अधिकाऱ्यांना संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी त्याच्या बॅगेची कसून तपासणी केली. त्यावेळी त्यांना गुटख्याची पाकिट सापडली. ही पाकिटे उघडल्यानंतर त्यात डॉलर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सर्व पाकिटे उघडण्यात आली. पाकिटातील सर्व डॉलर कस्टम अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत. आरोपीला ताब्यात घेतले आहे.

कस्टम अधिकारी आरोपीची चौकशी करत आहेत. हे डॉलर त्याने कुठून आणले. ते कुठे घेऊन जात होता. हे डॉलर कोणाला देणार होता. गुटख्याच्या पाकिटात हे डॉलर कुठे भरले. त्याच्या सोबत कोणी अजून होते का याची चौकशी कस्टम अधिकारी करत आहेत. एएनआयने या कारवाईचा व्हिडिओ प्रसारीत केला आहे.

ही व्यक्ति डॉलरची तस्करी करत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानुसार या व्यक्तिच्या सामानाची आम्ही तपासणी केली. त्यात गुटख्याची पाकिटे सापडली. गुटख्याची पाकिटे उघडल्यानंतर त्यात डॉलर आढळले. त्यामुळे आम्ही सर्व गुटख्याची पाकिटे उघडली. ४० हजार अमेरिकन डॉलरच्या शंभर नोटा जप्त करण्यात आल्या. कस्टम कायदा कलम ११० अंतर्गत ही जप्ती करण्यात आली. तर कलम १०४ अंतर्गत प्रवाशाला अटक करण्यात आली, अशी माहिती कस्टम अधिकाऱ्याने दिली.

याआधीही विमान प्रवासात सोने, घड्याळे, नोटांची व अन्य महागड्या वस्तूंची तस्करी केल्याच्या घटना घडल्या आहेत. कस्टम ड्युटी चुकवण्यासाठी तस्करी केली जाते. काहीवेळा तर अंर्तवस्त्रात किंवा शरीरात खास शस्त्रक्रिया करुन दागिने लपवले जातात. अशी तस्करीही कस्टम विभागाने कारवाई करुन उघडकीस आणली आहे. तरीही अशा तस्करींचे प्रमाण कमी झालेले नाही.

First Published on: January 10, 2023 11:06 AM
Exit mobile version