या माकडांमुळे आंध्रचे विभाजन होईल – चंद्रबाबू नायडू

या माकडांमुळे आंध्रचे विभाजन होईल – चंद्रबाबू नायडू

TDP एनडीएविरोधात मांडणार अविश्वासदर्शक ठराव ( फोटो सौजन्य - Hindustan times )

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी आता विरोधकांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे. ‘माकडांची टोळी सत्तेत आल्यास आंध्रप्रदेशचे विभाजन होईल’ अशा शब्दात चंद्रबाबू नायडू यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले आहे. शिवाय मागील ४ वर्षामध्ये टीडीपी सरकारच्या काळात राज्याची आर्थिक भरभराट झाल्याचा दावा देखील यावेळी नायडू यांनी केला. पण, राज्याच्या विकासामध्ये केंद्राने कोणतेही सहकार्य केली नसल्याचा नाराजी वजा टीकेचा सुर देखील यावेळी एन. चंद्रबाबू नायडू यांनी लावला. अंगणवाडी सेविकांच्या पगारामध्ये वाढ केल्याने अंगणवाडी सेविकांनी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. त्यावेळी बोलत असताना चंद्रबाबू नायडू यांनी विरोधकांना लक्ष्य केले. विरोधकांना लक्ष्य करत चंद्रबाबू नायडू यांनी आता आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे.

 विरोधकांची माकडाशी तुलना

विरोधकांवर टीका करताना एन. चंद्रबाबू नायडू यांनी विरोधकांची तुलना माकडाशी केली. यावेळी त्यांनी आंध्रच्या सर्वांगिण विकासासाठी पुन्हा एकदा तेलगु देशम पार्टीच्या हाती सत्ता द्या असे आवाहन केले. तसेच ‘काही लोक खोटे बोल पण रेटून बोल या मार्गाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे माकडांच्या हाती सत्ता गेल्यास राज्याचे विभाजन नक्की असल्याचे’ नायडू यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘विकासाची गंगा कायम राहण्यासाठी TDPच्या हाती सत्ता द्या’ असे आवाहन चंद्रबाबू नायडू यांनी केले आहे.

केंद्र सरकारवरही टीका

दरम्यान, नोटबंदी आणि GSTच्या निर्णयावरून चंद्रबाबू नायडू यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. नोटबंदी आणि GST लागू केल्याने देशातल्या सामान्य जनतेला कठीण काळातून जावे लागल्याचे नायडू यांनी म्हटले आहे.

…तर पंतप्रधानपदाच्या चाव्या TDPच्या हाती

यावेळी, बोलताना चंद्रबाबू नायडू यांनी पुढील पंतप्रधान कोण? हे ठरवण्याची राजकीय ताकद असल्याचे म्हटले आहे. राज्यातल्या जनतेने लोकसभा निवडणुकीमध्ये देखील TDPला भरभरून मते द्यावीत. सर्व २५ खासदार टीडीपीचे निवडून आल्यास पुढील पंतप्रधान ठरवण्याची ताकद ही टीडीपीमध्ये असेल असा दावा एन. चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे.

First Published on: June 24, 2018 11:05 AM
Exit mobile version