काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंदू टार्गेट, आणखी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंदू टार्गेट, आणखी एका बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या

कुलगाम : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात हिंदूंना पुन्हा एकदा टार्गेट करण्यात येत आहे. आज गुरुवारी सकाळी अतिरेक्यांनी कुलगाम येथील एका बँक मॅनेजरवर हल्ला केला. विजय कुमार असं या बँक मॅनेजरचं नाव असून ते राजस्थान येथे राहणारे होते. मूळचे राजस्थानचे असलेले विजय कुमार हे कुलगाम येथील मोहनपोरा येथील देहात बँकमध्ये मॅनेजर होते. त्यांच्यावर अतिरेक्यांनी गोळ्या झाडून हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील हिंदू नागरिक अतिरेक्यांच्या निशाण्यावर आले आहेत. हिंदू नागरिकांची सुरक्षा धोक्यात आल्याने पोलीस यंत्रणा आणि सरकार यांच्यापुढील आव्हाने वाढली आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल पॅकेज
येथील सरकारी कर्मचारीही अतिरेक्यांच्या टार्गेटवर आले असल्याने त्यांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधानांनी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. त्यानुसार, खोऱ्यातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना ६ जूनपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शोधमोहीम सुरू
अतिरेक्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. त्यासाठी पथकंही तैनात करण्यात आली असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

हल्ल्यांनी हादरले काश्मीर खोरे

१२ मे रोजी काश्मीर येथील बडगाम जिल्ह्याच्या चदूरा परिसरात काश्मीर पंडित राहुल भट याचीही हत्या करण्यात आली. १८ मे रोजी आतंकवाद्यांनी उत्तर काश्मीरच्या बारामुला येथील एका दारूच्या दुकानात प्रवेश करत ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात जम्मूमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले. २४ मे रोजी सैफुल्ला कादरी या पोलिसावर गोळ्या झाडून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर दोनच दिवसांनी कलाकार अमरीन भट याच्यावरही गोळीबार करण्यात आला. या घटनांमुळे काश्मीर खोरे हादरले आहे.

First Published on: June 2, 2022 2:14 PM
Exit mobile version