प्रसारमाध्यमांना सर्वाधिक धोका प्रमुख वृत्तवाहिन्यांपासूनच, अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

प्रसारमाध्यमांना सर्वाधिक धोका प्रमुख वृत्तवाहिन्यांपासूनच, अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली : खरी पत्रकारिता सत्याचा सामना करणे, सत्य लोकांसमोर आणणे आणि आपल्या व्यासपीठावर दोन्ही बाजूंना त्यांचे विचार मांडण्याची समान संधी देणे ही असते. पण सध्या मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांना आज सर्वात मोठा धोका प्रमुख वृत्तवाहिन्यांचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.

अनुराग ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी आशिया-पॅसिफिक प्रसारण विकास संस्थेच्या 20व्या बैठकीचे आणि 47व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन, माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा आणि एआयबीडीच्या संचालक फिलोमेना नानाप्रगासम यावेळी उपस्थित होत्या.

चर्चात्मक कार्यक्रमात अशा वक्त्यांना बोलावले जाते जे दिशाभूल करणारे समज पसरवतात, जे अशा वादविवादात बेंबीच्या देठापासून ओरडत असतात; अशा लोकांमुळे वाहिन्यांची विश्वासार्हता कमी होते, असे मत अनुराग ठाकूर यांनी मांडले. वक्ते कोण असावेत, कार्यक्रमाचा सूर कसा असावा, दृश्य कशी असावीत याबद्दलचे तुमचे निर्णयच प्रेक्षकांमध्ये विश्वासार्हता निश्चित करत असतात. कदाचित, एखादा प्रेक्षक मिनिटभर तुमची चर्चा बघण्यासाठी थांबेलही, मात्र तो कधीही तुमच्या सूत्रसंचालक / निवेदकावर विश्वास ठेवणार नाही. तुमच्या वाहिन्या किंवा ब्रॅण्ड विश्वासार्ह आणि पारदर्शक बातम्या देणारा स्रोत आहे, असे त्याला कधीही वाटणार नाही, असेही ते म्हणाले. एखाद्या व्यक्तीचा बाईट तुमच्या वाहिनीकडे असल्यास तेवढ्यावरुन तयार झालेले मत दाखवू नका तर, त्या म्हणण्यामागचा उद्देश आणि अर्थ समजून घेत, स्वतः त्याचा अन्वयार्थ लावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित प्रसारमाध्यम प्रतिनिधींना केले.

या कार्यक्रमादरम्यान 2021 आणि 2022च्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. रेडिओ टेलिव्हिजन ब्रुनेईला 2021साठीचा प्रशंसा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, 2022चा प्रशंसा पुरस्कार अर्थव्यवस्था, नागरी सेवा, दळणवळण, गृहनिर्माण आणि समुदाय विकास मंत्रालय, फिजी प्रजासत्ताक आणि फिजी प्रसारण महामंडळाला विभागून देण्यात आला. 2021चा जीवनगौरव पुरस्कार कंबोडियाचे माहिती आणि दळणवळण मंत्री खियू खानहरिथ यांना प्रदान करण्यात आला. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आशिया-प्रशांत प्रसारण विकास संस्थेचे (एआयबीडी) अध्यक्ष मयंक अग्रवाल यांना 2022साठीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रसारमाध्यमांची प्रशंसा
योग्य माहिती योग्य वेळी लोकांपर्यंत पोहोचली तर त्यामुळे लाखो लोकांचे जीव वाचवले जाऊ शकतात, हे कोविडने आपल्याला शिकवले. प्रसारमाध्यमांनी या परीक्षेच्या काळात संपूर्ण जगाला एका व्यासपीठावर एकत्र आणले आणि ‘वसुधैव कुटुंबकम’चे तत्व पुन्हा आचरणात आणले, असे सांगून अनुराग ठाकूर म्हणाले, भारतीय प्रसारमाध्यमांची कोविड महामारीच्या काळातील भूमिका ही एक यशोगाथा आहे. कोविड-19विषयी जनजागृती करणारे संदेश, सरकारच्या महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना, डॉक्टरांकडून मोफत ऑनलाइन मार्गदर्शक सेवा-सुविधा देशातल्या कानाकोपऱ्यातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची होती.

First Published on: September 21, 2022 4:40 PM
Exit mobile version