जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीवर असलेल्या जवानाची गोळी घालून हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये सुट्टीवर असलेल्या जवानाची गोळी घालून हत्या

शहीद जवान मोहम्मद रफी यातू

जम्मू-काश्मीरमधला तणाव कमी होण्याचे नाव घेत नाही. बारामुला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी एका सैनिकाची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. बारामुला जिल्ह्यातील सोपोर येथीस वरपोरा गावात काल (शुक्रवारी) ही घटना घडली. मोहम्मद रफी यातू असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. जम्मू-काश्मीरच्या लाईट इन्फट्रीमध्ये हा जवान कार्यरत होता. मात्र सुट्टीनिमित्त तो आपल्या घरी आला होता.

दरम्यान, लष्कर, पोलिसांचे विशेष पथक आणि सीआरपीएफने हल्लेखोरांना अटक करण्यासाठी शोधपथक नेमले असून हल्लेखोरांचा कसून शोध लावला जात आहे. १ एप्रिल रोजीच जम्मू-काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानने गोळीबार केल्यामुळे एका पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. तसेच येथील स्थानिक नागरिकही या गोळीबारात जखमी झाले होते.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्यामुळे सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झाला होता. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले होते, मात्र आता त्यांची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या स्थानिकांना दहशतीच्या सावटाखाली आणण्यासाठी पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणावर हल्ले केले जात आहेत. गोळीबार आणि बॉम्ब फेकण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

लागोपाठ पाचव्या दिवशी आज पुँछ आणि राजौरी जिल्ह्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात मोहम्मद शरीफ मग्रे, हनीफा बी, शौखत हुसेन आणि लष्कारातील सुरक्षा रक्षक पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झाले होते.

First Published on: April 6, 2019 7:25 PM
Exit mobile version