Arvind Kejriwal : नेमकी हीच वेळ कशी साधली? केजरीवालांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Arvind Kejriwal : नेमकी हीच वेळ कशी साधली? केजरीवालांच्या अटकेवर सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीकडून झालेल्या आपल्या अटकेला आव्हान दिले आहे. याबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या अटकेबाबत काही प्रश्न उपस्थित केले. नेमक्या निवडणुका तोंडावर असतानाच ही अटक कशी झाली, याबाबतचे स्पष्टीकरण न्यायालयाने ईडीकडे मागितले आहे. याप्रकरणी ईडीला शुक्रवारपर्यंत वेळ देण्यात आला आहे. (Arvind Kejriwal ed news delhi cm arrest plea supreme court hearing)

न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने यांच्यासमोर या याचिकेची सुनावणी सुरू आहे. स्वातंत्र्य ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, आणि हे कोणीच नाकारू शकत नाही. आणि नेमक्या वेळीच अटक कशी होऊ शकते, असा प्रश्न देखील खंडपीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांना विचारला आहे. याव्यतिरिक्त न्यायालयाने आणखी देखील काही प्रश्नांची उत्तरे ईडीकडून मागितली असून पुढील सुनावणीच्या वेळी उत्तरे देण्यास सांगितले आहे.

आपल्या अटकेला आव्हान देणाऱ्या केजरीवाल यांच्या याचिकेवर दुसऱ्या दिवशी, मंगळवारी देखील सुनावणी झाली. यावेळी केजरीवाल यांची बाजू वरिष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी मांडली. कथित मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली. 21 मार्चला अटक झाल्यापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. (Arvind Kejriwal ed news delhi cm arrest plea supreme court hearing)

समन्स बजावूनही हजेरी का नाही?

ईडीने वारंवार समन्स बजावूनही केजरीवाल हे ईडीसमोर हजर न राहिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत केजरीवाल यांना विचारणा केली. ज्या प्रकरणात आपल्याला अटक करण्यात आली आहे, त्या प्रकरणात आपले म्हणणे नोंदवून घेतले नसल्याचे केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेत म्हटले होते. याबाबत न्यायालयाने आपले मत नोंदवले. वारंवार बोलावूनही चौकशीला हजर न राहता, अटकेला आव्हान देणे योग्य आहे का, अशी विचारणा देखील न्यायालयाने केली. तुम्ही परस्पर विरोधी बोलत आहात असे तुम्हाला वाटत नाही का, असा प्रश्न खंडपीठाने केजरीवाल यांना विचारला. तुम्ही सांगता की, पीएमएलए कायद्यांतर्गत तुमचे म्हणणे नोंदवून घेतले नाही. पण, ते म्हणणे नोंदवून घेण्यासाठी तुम्हाला जेव्हा बोलावले गेले तेव्हा तुम्ही हजरच राहिला नाहीत. आणि आता म्हणता की माझे म्हणणे ऐकून घेतले नाही. न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांनी केजरीवाल यांचे वकील अभिषेक सिंघवी यांना अनेक प्रश्न विचारले. तसेच या प्रकरणी केजरीवाल यांनी कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज का नाही केला, असाही प्रश्न उपस्थित केला. (Arvind Kejriwal ed news delhi cm arrest plea supreme court hearing)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 30, 2024 8:52 PM
Exit mobile version