Arvind Kejriwal : …हा तर हनुमानाचा आशीर्वाद; आम आदमी पार्टी का म्हणाली असं?

Arvind Kejriwal : …हा तर हनुमानाचा आशीर्वाद; आम आदमी पार्टी का म्हणाली असं?

नवी दिल्ली : कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सध्या तिहार तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर डायबिटिससाठी तुरुंगात इन्सुलिन दिले गेले. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला. (Arvind Kejriwal given insulin in tihar jail after high sugar level)

सध्या तिहार तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांची शुगर 320 पर्यंत गेली. त्यानंतर केजरीवाल यांना इन्सुलिन देण्यात आले. अटक केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांना इन्सुलिन देण्यात आले आहे. केजरीवाल बऱ्याच काळापासून डायबिटीस रुग्ण आहेत. न्यायालयीन कोठडीत गेल्यापासून अरविंद केजरीवाल हे इन्सुलिन तसेच नियमित डॉक्टरांच्या भेटीसाठी आग्रही होते. यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका देखील केली होती. मात्र, न्यायालयाने खासगी डॉक्टरची मागणी फेटाळत एम्सलाच एक वैद्यकीय पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या सगळ्या घडामोडीत आम आदमी पक्षाने देखील केजरीवाल यांना इन्सुलिन दिले जावे, अशी मागणी आक्रमकरित्या केली होती. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत कट रचला जात असून सातत्याने शुगरमध्ये वाढ होऊनही त्यांना इन्सुलिन दिले जात नसल्याची पक्षाची तक्रार होती.

हा तर हनुमानाचा आशीर्वाद

केजरीवाल यांना आज इन्सुलिन देण्यात आल्याने, हा हनुमानाचा आशीर्वाद असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पक्षाने दिली आहे. सोशल मिडीयावर केलेल्या पोस्टमध्ये पक्षाने म्हटले की, बजरंग बली की जय, भाजपा आणि त्यांच्या तुरुंग प्रशासनाला सुबुद्धी आली म्हणायची. आणि त्यांनी केजरीवाल यांना इन्सुलिन दिले. केजरीवाल यांची शुगर 320 पर्यंत गेली होती. भगवान हनुमान यांचा आशीर्वाद आणि दिल्लीतील जनतेच्या संघर्षामुळे हे शक्य झाले आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत इन्सुलिन पोहोचवण्यात आम्ही यशस्वी झाल्याचेही पोस्टमध्ये म्हटले आहे. (Arvind Kejriwal given insulin in tihar jail after high sugar level)

दरम्यान, सोमवारी केजरीवाल यांनी तिहार जेलच्या पर्यवेक्षकांना पत्र लिहीत आपण दररोज इन्सुलिनची मागणी करत असल्याचे सांगितले. केजरीवाल यांच्या या पत्राच्या एक दिवस आधीच तिहार प्रशासनाने एक निवेदन जारी केले होते. यात त्यांनी म्हटले की, 20 एप्रिल रोजी एम्सच्या वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांसमवेत केजरीवाल यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भेट घालून दिली होती. मात्र, या भेटीदरम्यान केजरीवाल यांनी देखील इन्सुलिन बद्दल काही सांगितले नाही, आणि डॉक्टरांनी देखील असा कोणता सल्ला दिला नाही.

राजकीय दबावामुळे तिहार तुरुंग प्रशासन खोटं बोलत असल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे. तसेच, डॉक्टरांसोबत चर्चा करताना इन्सुलिन बाबत काहीही चर्चा झाली नसल्याचा अधिकाऱ्यांचा दावा देखील केजरीवाल यांनी फेटाळला. हे अत्यंत चुकीचे आहे. गेल्या 10 दिवसात मी अनेकदा इन्सुलिन बद्दल विचारणा केली आहे. माझ्यासमोर जे डॉक्टर आले, त्यांना मी माझ्या आजाराची माहिती दिली. दररोज तीन वेळा साखरेत वाढ होते आणि ती 250 ते 320 दरम्यान असते, असं केजरीवाल सांगतात. (Arvind Kejriwal given insulin in tihar jail after high sugar level)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 23, 2024 4:25 PM
Exit mobile version