वाजपेयींची प्रकृती स्थिर

वाजपेयींची प्रकृती स्थिर

नवी दिल्ली – माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याचे एम्स हॉस्पिटलने आपल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे. बुधवारी सकाळी वाजपेयींना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. इस्पितळात दाखल झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांची भेट घेतली.
वाजपेयींना मूत्रसंसर्ग झाला आहे. पण सध्या त्यांना ताप नाही. तसेच त्यांचा रक्तदाबही सामान्य आहे. त्यांना बुधवारी सकाळी डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता असली तरी हॉस्पिटलकडून त्याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही.
वाजपेयींना क्रिटिकल केअर युनिट म्हणजेच सीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. कारण केंद्रीय मंत्री अरुण जेटली ऑपरेशननंतर अजूनही ‘एम्समध्येच आहेत. हॉस्पिटलमध्ये एकच व्हीव्हीआयपी रुम आहे. त्यामुळे वाजपेयींना सीसीयूमध्येच ठेवण्यात आले आहे.

स्मृतीभ्रंशाने वाजपेयी ग्रस्त

वाजपेयी २००९ सालापासून आजारी असून त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ते ग्रस्त आहेत. त्यातच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याचे सुरुवातीला सांगितले गेले. मात्र त्यांना मूत्रसंसर्ग झाल्याचे आढळल्याने त्यांचा हॉस्पिटलमधील मुक्काम वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली. मोदींच्या अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली.मोदी जवळपास ५५ मिनिटे रुग्णालयात होते. त्यानंतर लगेच राजनाथ सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही रुग्णालयात येऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

First Published on: June 13, 2018 3:27 AM
Exit mobile version