वाजपेयी यांच्या नजरेतून सुधीर फडके आणि गदिमा यांचे ‘गीतरामायण’

वाजपेयी यांच्या नजरेतून सुधीर फडके आणि गदिमा यांचे ‘गीतरामायण’

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी

ज्येष्ठ गीतकार ग. दि. माडगुळकर यांच्या ‘गीतरामायणा’मुळे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी चांगलेच प्रभावित झाले होते. अटलबिहारी यांनी ‘गीतरामायणा’तील रौप्य जयंती कार्यक्रमांच्या आठवणींना उजाळा देताना गीतकार माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांचे तोंड भरून कौतुक केले. एका जुन्या व्हिडिओच्या माध्यमातून अटलबिहारी यांच्या भावना व्यक्त होत आहेत.

‘मी गीतरामायणाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालो होतो. तो दिवस ‘गीतरामायणा’च्या रौप्य जयंतीचा होता. खूप वर्ष लोटली असली तरी माझ्या मनात त्यांची आठवण ताजी होती. त्यावेळी माडगुळकर हयात नव्हते. पण सुधीर फडके त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. परंतु आज तेही आपल्यात नाहीत. हा तर नियतीचा खेळ आहे. हे काळचक्र सुरुच राहतं. आपण मातीचे बनलो आहोत. एका पावसात वाहून जाऊ. मात्र गीतरामायणाला सुवर्ण जयंती साजरी केल्यानंतर हिरक जयंतीची ही तयारी करावी लागणार आहे.’

ही आठवण सांगताना त्यांनी तुलसीदास यांच्या रामायणातील एक प्रसंगही सांगितला. तो असा…’राम आणि सीता वनवासात होते. तब्बल १४ वर्षांचा वनवास होता. खूप वर्ष लोटली, मात्र अजून बराच काळ जायचाही होता. सीतेने रामाला विचारले. हा वनवास कधी संपणार? त्यावर रामने म्हटले, (अर्थात तुलसीदास यांच्या शब्दांत) दिवस जात नही लागही बारा (दिवस जायला वेळ लागत नाही).’

‘आज मी नेमकं तेच अनुभवतोय. कवी ग. दि. माडगुळकर आज आपल्यात नाहीत. मात्र त्यांचा आत्मविश्वास पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो. हा आत्मविश्वास फक्त प्रतिभेशी संबंधित नव्हता. तर त्यांच्यात काहीतरी अंतर्गत प्रेरणा होती. माडगुळकरांनी लिहिले होते… ‘माझा तोच वंश आहे जो ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा आहे. माझ्या रक्तात थोडा अंश देवाचा आहे.’

‘आता देवामध्येही रक्त असते ही कल्पना एक कवीच करू शकतो. पण भावना अशा आहेत की थोडा अंश माझ्यातही आहे. हा कवीचा आत्मविश्वास आहे,’ असे अटलबिहारी वाजपेयी माडगुळकरांबाबत सांगतात.

काय आहे या ओळी 

ज्ञनियाचा वा तुक्याचा
तोच माझा वंश आहे
माझ्या रक्तात थोडा
ईश्वराचा अंश आहे

कवी तुलसीदास नाहीत पण त्यांनी लिहिलेले रामायण कायम राहील. सुधीर आपल्यात नाहीत पण त्यांचं संगीत आपल्याला प्रेरणा देत राहील. माडगुळकर आणि फडके आज नसले तरी रामकथांचा प्रवाह निरंतन सुरूच आहे’, असेही वाजपेयींनी यावेळी म्हटले होते.

First Published on: August 16, 2018 5:39 PM
Exit mobile version