नियमानुसार अवनीला ठार केलं – मुनगंटीवार

नियमानुसार अवनीला ठार केलं – मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार आणि अवनी वाघीण

अवनी अर्थात टी – १ वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर त्यावरून आता वनखात्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जोरदार टीका होतेय. केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी देखील मुनगंटीवारांवर नेम धरला. त्यावर आता सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. टी -१ वाघिणीला जेरबंद करण्याचे प्रयत्न झाले. पण, ते फोल ठरले. त्यानंतरच वाघिणीला ठार करण्यात आलं. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच ही कार्यवाही झाल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

नरभक्षक टी-१ वा‍घिणीच्या मृत्यूसंदर्भात आज मंत्रालयात मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी,वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी त्याचबरोबर मानवी जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या वन्यजीवांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना सुचविण्याकरता उप वनसंरक्षक यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक सल्लागार आणि संनियंत्रण समितीच्या नेमणुका केलेल्या आहेत. या समितीमध्ये एनटीसीएचे प्रतिनिधी, तज्ज्ञ, वन्यजीव क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, पशुवैद्यक आदींचा समावेश असतो. अशी माहिती देखील दिली.

वाचा – अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार: मुख्यमंत्री फडणवीस

मानवांवर हल्ले करून १३ जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला ठार करण्यापूर्वी तिला जिवंत पकडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रयत्न फोल ठरल्यानंतर तिला ठार केल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाघिणीनं गस्तीपथकावर हल्ला केल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर त्यावर आता संशय घेतला जात आहे. तसेच वनखात्यासह सुधीर मुनगंटीवारांवर टीका करत हेतुबाबत देखील शंका घेतली जात आहे. त्यावर आता मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

वाचा – वाघिणीची हत्या; मेनका गांधी राज्य सरकारवर भडकल्या

First Published on: November 5, 2018 8:57 PM
Exit mobile version