या निर्णयामुळे भाजपच्या राजकारणाला आवर – रणदीप सुरजेवाला

या निर्णयामुळे भाजपच्या राजकारणाला आवर – रणदीप सुरजेवाला

रणदीप सुरजेवाला, प्रवक्ते, काँग्रेस

अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अखेर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणावर पडदा पडला आहे. यामुळे देशात हिंदू-मुस्लीम ऐक्याचं नवं पर्व सुरू होईल असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील मान्यवर निर्णयाचं शांततेत स्वागत करण्याचं आवाहन जनतेला करत आहेत. त्यातच आता काँग्रेसकडून या मुद्द्यावर प्रतिक्रिया आली आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अयोध्येत राम मंदिर उभारणीचे दरवाजे खुले झाले असून भाजपच्या या मुद्द्यावरच्या राजकारणाचे दरवाजे मात्र बंद झाले आहेत’, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आता आला आहे. आम्ही देखील राम मंदिराच्या बांधकामाच्या बाजूचे आहोत. या निकालामुळे फक्त मंदिराच्या उभारणीचा मार्ग खुला होणार नसून या मुद्द्यावरून भाजपनं इतक्या वर्षांपासून जे राजकारण केलं, त्या राजकारणाचा मार्ग देखील बंद झाला आहे’, अशी प्रतिक्रिया सुरजेवाला यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.


Ayodhya Verdict : जागा रामलल्लाचीच, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे मुद्दे!

प्रियंका गांधींचं ट्वीट, पण राहुल गांधी अजूनही नॉट रीचेबल!

दरम्यान, या निकालानंतर काँग्रेसच्या उत्तर प्रदेश सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा यांनी ट्वीट करून सामाजिक सलोख्याची भावना कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

दरम्यान, निकालानंतर लागलीच प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली असली तरी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र निकाल लागून तासभर उलटल्यानंतर देखील ट्वीटर किंवा अन्य कुठेही प्रतिक्रिया दिलेली नाही.

First Published on: November 9, 2019 2:24 PM
Exit mobile version