Baba Ramdev : आमचं चुकलं; सार्वजनिकरित्या माफी मागण्यास बाबा रामदेव तयार

Baba Ramdev : आमचं चुकलं; सार्वजनिकरित्या माफी मागण्यास बाबा रामदेव तयार

नवी दिल्ली : पतंजली आयुर्वेदचे प्रमुख आणि योग गुरू बाबा रामदेव यांनी सार्वजनिक माफी मागणार असल्याचे सांगितले. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत बाबा रामदेव यांच्या वकिलांनी हा पर्याय दिला. यावर न्यायालयाने त्यांना एका आठवड्याचा वेळ दिला असून या प्रकरणी पुढील सुनावणी 23 एप्रिल रोजी होणार आहे. कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी आपल्याकडे एक औषध असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला होता. (baba ramdev will seek public apology supreme court gives one week)

ऍलोपॅथी औषधांच्या विरोधात बाबा रामदेव यांनी केलेल्या चुकीच्या जाहिरातींविरोधात सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तेव्हा आम्ही सार्वजनिकरित्या माफी मागण्यास तयार असल्याचे बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी बालाकृष्ण यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी न्या. हिमा कोहली आणि न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर सांगितले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना माफ करण्यास नकार दिला आहे.

तुम्ही न्यायालयाविरोधात वागलात, ते योग्य आहे का?

तुम्ही जे वागलात, ते न्यायालया विरोधात होते, तुमचे वागणे योग्य आहे असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न न्या. हिमा कोहली यांनी बाबा रामदेव यांना विचारला. त्यावर बाबा रामदेव म्हणाले की, आमच्याकडून चूक झाली आहे आणि आम्ही त्यासाठी बिनशर्त माफी मागू इच्छितो. त्यावर, कोहली यांनी आम्ही तुमच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारत आहोत, असे सांगितले. यासोबतच बाबा रामदेव यांनी पत्रकार परिषद घेत ऍलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्याबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आपल्या देशात सगळेच जण सगळ्या गोष्टींचा वापर करत असतात, केवळ आयुर्वेदाचाच वापर होत नाही. त्यामुळे अशाप्रकारे पत्रकार परिषद घेणे देखील योग्य नाही.

इशारा दिल्यानंतरही जाहिरात का प्रसिद्ध झाली?

कोरोनील औषधाने कोरोना नष्ट होण्यासंबंधातील शेवटची जाहिरात कधी प्रसिद्ध झाली, अशी विचारणा रामदेव बाबा यांना केली. त्यावर, अशी जाहिरात फेब्रुवारीत प्रसिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला आधीच जाहिरात थांबवण्याचे आदेश देऊनही जाहिराती का थांबवल्या नाहीत, असे विचारल्यावर आम्हाला कायद्याचे ज्ञान नाही, यापुढे अशी चूक होणार नाही, असे रामदेव बाबा यांनी न्यायालयाला सांगितले. न्या. अमानुल्लाह म्हणाले की, तुम्हाला आदेश दिल्यानंतरही तुम्ही दुसऱ्या कोणाला दोष कसा देऊ शकता? यावर बालाकृष्ण म्हणाले की, आमच्याकडून जे घडले ते अनावधानाने घडले. आम्ही असे करायला नको होते. यापुढे आम्ही हे लक्षात ठेवू. आमच्या चुकीबद्दल आम्ही माफी मागतो. (baba ramdev will seek public apology supreme court gives one week)

न्यायालयाने देखील केले कौतुक

या सुनावणी दरम्यान बाबा रामदेव यांना त्यांच्या चुकीची समज देत असतानाच न्यायालयाने योगा संदर्भात तुम्ही अत्यंत चांगले काम करत असल्याचे सांगत त्यांचे कौतुकही केले.

काय आहे प्रकरण?

आयएमएचा आरोप आहे की पतंजलीने कोविड-19 लसीकरणाविरोधात बदनामीकारक मोहीम चालवली होती. त्यावर न्यायालयाने पतंजली आयुर्वेदाच्या खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती तत्काळ थांबवाव्यात, असा इशारा दिला होता. विशिष्ट आजारांवर उपचार केल्याचा खोटा दावा करणाऱ्या प्रत्येक उत्पादनाला एक कोटी रुपयांपर्यंत दंड होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. कोविड-19 महामारीच्या काळात ॲलोपॅथी फार्मास्युटिकल्सवरील वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल आयएमएने दाखल केलेल्या फौजदारी खटल्यांचा सामना करणाऱ्या रामदेव यांनी ही प्रकरणे रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. (baba ramdev will seek public apology supreme court gives one week)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

First Published on: April 16, 2024 9:30 PM
Exit mobile version