लग्नात जेवणाच्या पत्रावळीसाठी एकाचा खून, ५ जखमी

लग्नात जेवणाच्या पत्रावळीसाठी एकाचा खून, ५ जखमी

पत्रवळी कमी पडल्याने त्याने केला राडा

माणसाच्या जिवाची किंमत राहिली नाही असे संवाद आपण अनेकदा ऐकतो. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खरंच जिवाची किंमत राहिली नसल्याचं सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशच्या बलियामध्ये झालेल्या एका लग्न समारंभामध्ये निव्वळ जेवणावरून झालेल्या वादावादीचा परिणाम एका व्यक्तीची हत्या होण्यात झाला आहे. एवढंच नाही, तर या घटनेमध्ये ५ जण जखमीही झाले आहेत. या सर्व जखमींना नजीकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, घडल्या प्रकारामुळे बलियामध्ये एकच खळबळ उडाली असून वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

पत्रावळी कमी पडल्याने झाला वाद

विक्रमपूरच्या हरीकिशन पटेल यांच्या मुलीचे शनिवारी लग्न होते. या लग्नासाठी सुखपुरा येथील बसंतपूर गावातून वऱ्हाड आले होते. या पाहुण्यांसाठी नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. रात्री आठ वाजता गावातील काही तरुण जेवण करण्यासाठी बसले. मात्र, लग्नासाठी जास्त पाहुणे आल्यामुळे जेवणासाठी पत्रावळ्या कमी पडल्या. त्यामुळे जेवण वाढणाऱ्यांनी या तरुणांना थोड्यावेळ थांबण्यास सांगितले. पण जर पत्रावळी नव्हती तर आम्हाला निमंत्रण का दिले? यावरुन जेवण वाढणारे आणि या तरुणांमध्ये वादावादी झाली.

लग्नातच तुफान हाणामारी

या वादावादीचे प्रकरण मिटले होते. पण या तरुणांनी गावातील लोकांना यासंदर्भात माहिती दिली. गावातील लोक संतप्त होऊन काठ्या आणि हॉकी स्टीक घेऊन लग्नाच्या ठिकाणी आले. आणि त्यांनी जेवण वाढणाऱ्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये ६ जण जखमी झाले. सर्वांना उपचारासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमधील २० वर्षाच्या विशाल पटेल याची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्याला वाराणसीच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण त्याठिकाणी पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु

विशाल पटेल याच्या मृत्यूनंतर गावामध्ये तणावाचे वातावरण होते. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

First Published on: June 25, 2018 3:53 PM
Exit mobile version