आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी

आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी

आंतरराष्ट्रीय विमानांवर आता ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. आधी ही बंदी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती ७ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, आता ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. विशेष विमाने आणि माल वाहतूक विमानांना यातून वगळण्यात आले आहे असेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मोदी सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढून यासंदर्भातली माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या नव्या प्रकाराने आता भारतातही पाऊले ठेवले आहे. भारतात जवळपास २० कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशांच्या शरीरात कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने ब्रिटनमधून येणार्‍या व जाणार्‍या विमानांवर घातलेली बंदी ७ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री पुरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. आता आंतरराष्ट्रीय विमानांवर ३१ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्यानंतर अनेक देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनसोबतची हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला होता. भारतानेही नव्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन ब्रिटनमधून येणार्‍या विमानांवर बंदी घातली होती. मात्र, त्यापूर्वीच भारतात दाखल झालेल्या प्रवाशांच्या माध्यमातून कोरोनाच्या नव्या विषाणूने देशात शिरकाव केला आहे. मंगळवारी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नवा विषाणू आढळून आला होता. ही संख्या बुधवारी २० वर गेली आहे. त्याचबरोबर या पॉझिटिव्ह प्रवाशांच्या संपर्कात आलेले नागरिकही पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

First Published on: December 31, 2020 6:41 AM
Exit mobile version