आज ATM चा आधार; बँक कर्मचारी संपावर

आज ATM चा आधार; बँक कर्मचारी संपावर

देशभरातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी बुधवारी (आज) एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांचं वेतनवाढ, राष्ट्रीयकृत बँकांचे विलिनीकरण या सारख्या अनेक मुद्द्यांवरुन हा संप पुकारण्यात आला. संपूर्ण देशातील सुमारे १० लाखापेक्षा अधिक बँक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. त्यामुळे सहाजिकच आज देशभरातील बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. त्यामुळे आज पैशाच्या व्यवहारासाठी नागरिकांना ATM चा आधार घ्यावा लागणार आहे. विजया बँक आणि देना बँक या बँकांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. याशिवाय आणखी काही बँकांचे विलिनीकरण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर हे विलिनीकरण धोकादायक निर्णय असून, या निर्णयामुळे बँकांचे आणि कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा दावा बँक कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. याच कारणास्तव आज बँक कर्मचाऱ्यांनी आपला विरोध दर्शवण्यासाठी हा एकदिवसीय संप पुकारला आहे.


वाचा : ‘खान’ आडनावामुळेच आमिर, नसीर टार्गेट – अमोल पालेकर

शनिवार, रविवारच्या लागोपाठ दोन सुट्ट्यांनंतर मंगळवारी २५ डिसेंबरलाही नाताळची सुटी होती. त्यामुळे बँकांचे कामकाज मंदावले होते. अशातच आज (बुधवारी) देखील बँका बंद राहणार असल्यामुळे खातेदारांचे हाल होणार आहेत. मात्र, या संपाविषयी जवळपास सर्वच ग्राहकांना पूर्वसूचना दिल्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही असं बँकांचं म्हणणं आहे. उपलब्ध माहितीनुसार, अनेक बँकांनी एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम बाहेरील एजन्सीजना दिले आहे. त्यामुळे एटीएममधील कॅश उपलब्धता आज संपूर्ण दिवस कायम राहील, असं बँकेंच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पैसे भरण्याच्या किंवा काढण्याच्या व्यवहारासाठी आज नागरिकांना ATM चा आधार घ्यावा लागणार आहे.

First Published on: December 26, 2018 10:13 AM
Exit mobile version