‘या’ तीन बँकांचे होणार विलिनीकरण, सरकारची घोषणा

‘या’ तीन बँकांचे होणार विलिनीकरण, सरकारची घोषणा

बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचे लवकरच विलिनीकरण

केंद्र सरकारने आज तीन बॅंकांचे विलिनीकरण करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या तीन बँकांचा समावेश आहे. या तिनही बँकाचे विलिनीकरण करुन सरकार भारतातील तिसरी सर्वात मोठी सरकारी बँक बनवण्याच्या विचारात आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांचे विलिनिकरण करुन देशातील तिसरी मोठी सरकारी बँक बनवण्याचा प्रस्ताव सादर केला. दरम्यान वित्तिय सेवा विभागाचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितल्यानुसार, विलिनिकरणाच्या प्रक्रियेदरम्यान या तिनही बँकांमधील कर्मचाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाते.


राजीव कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ‘याआधी भारतीय स्टेट बँकेच्या ५ सहयोगी बँकाचे अशाचप्रकारे विलिनीकरण झाले आहे. त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचे कुठल्याही प्रकारे नुकसान झालेले नाही. त्याचप्रमाणे या तीन बॅंकाच्या विलिनीकरणानंतरही कर्मचाऱ्यांची कामे स्वतंत्र पातळीवर सुरुच राहतील. त्यांच्या रोजगारावर गदा येणार नाही’. याशिवाय कुमार म्हणाले, ‘या विलिनीकरणामुळे बँकांची कार्यक्षमता तसंच बँकांद्वारे ग्राहकांना पुरवली जाणारी सेवा, यामध्ये सुधारणा व्हायला मदत होईल. सरकारी बँकांची संख्या कमी करुन त्यांची आर्थिक क्षमता वाढवणं, हा या विलिनीकरणामागील सरकारचा मुख्य उद्देश आहे. यापुढेही हा प्रक्रिया अशीच सुरु राहील’.

First Published on: September 17, 2018 7:20 PM
Exit mobile version