बीबीसी माहितीपट : पाकिस्तानी वंशाच्या खासदाराचा आक्षेप ऋषी सुनक यांनी काढला खोडून

बीबीसी माहितीपट : पाकिस्तानी वंशाच्या खासदाराचा आक्षेप ऋषी सुनक यांनी काढला खोडून

लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या बीबीसीच्या माहितीपटाचा वाद आता ब्रिटिश संसदेत पोहोचला आहे. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लगेचच नरेंद्र मोदी यांचा बचाव केला. या माहितीपटात पंतप्रधान मोदी यांचे चरित्र चित्रण जे केले आहे, त्याच्याशी आपण सहमत नाही, असे सुनक म्हणाले.

बीबीसीने ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ नावाची दोन भागांची मालिका तयार केली आहे. या मालिकेत पंतप्रधान मोदी आणि भारतातील मुस्लिमांमध्ये तणाव असल्याचे म्हटले आहे. यासोबतच गुजरात दंगलीदरम्यान पंतप्रधान मोदींची कथित भूमिका आणि दंगलीत हजारो लोकांचा बळी गेल्याबाबतही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसेन यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला सुनक यांनी सडेतोड उत्तर दिले. याबाबत यूके सरकारची भूमिका स्पष्ट आणि पूर्वीपासूनचीच असून त्यात बदल झालेला नाही, असे सांगून सुनक म्हणाले, अर्थात, कुठेही असली तरी, आम्ही छळवणूक सहन करत नाही. पण नरेंद्र मोदींबद्दल जे चारित्र्यचित्रण केले गेले आहे, त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही.

स्क्रोल डॉट इनच्या वृत्तानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बनवलेला ‘द मोदी क्वेश्चन’ हा माहितीपट बुधवारी युट्यूबवरून हटवण्यात आला. तथापि, यावरून वाद सुरूच आहे.

लॉर्ड रामी रेंजर यांची बीबीसीवर टीका
ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे सदस्य लॉर्ड रामी रेंजर यांनी बुधवारी आपल्या ट्विटमध्ये बीबीसीवर निशाणा साधला. बीबीसी न्यूज, तुम्ही भारतातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकशाही पद्धतीने निवडून आलेले भारताचे पंतप्रधान, भारतीय पोलीस आणि भारतीय न्यायव्यवस्थेचाही अपमान केला आहे. आम्हाला दंगली आणि त्यात जाणारा निष्पापांचा बळी याचा आम्ही निषेधच करतो. पण त्याचबरोबर तुमच्या पक्षपाती रिपोर्टिंग निषेध करतो, असे ट्वीट लॉर्ड रामी रेंजर यांनी केले आहे.

भारताची टीका
हा माहितीपट म्हणजे, एका प्रचाराचा भाग असल्याचे आम्हाला वाटते. त्यात वस्तुनिष्ठता नाही. हा माहितीपट पक्षपाती असून तो भारतात प्रदर्शित केला गेला नाही, याकडे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी लक्ष वेधले. यात पूर्वग्रहदूषित, निष्पक्षतेचा अभाव आणि वसाहतवादी मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्यांनी तपास आणि पडताळणी यासारख्या शब्दांचा वापर केल्याने एक विशेष मानसिकता असल्याचे जाणवते, असे परराष्ट्र मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बीबीसीने तयार केलेल्या माहितीपटाबाबत सांगितले.

First Published on: January 19, 2023 8:08 PM
Exit mobile version