मातृत्वाची नवी परिभाषा; तिने पाजले बेवारस अर्भकाला दूध

मातृत्वाची नवी परिभाषा; तिने पाजले बेवारस अर्भकाला दूध

बंगळुरु महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना

सोशल मीडियावर सध्या बंगळुरुच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चनाचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. अर्चनाने एका बेवारस नवजात अर्भकाला दूध पाजलं. तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.

प्लास्टिकच्या पिशवीत सापडलं नवजात अर्भक

बंगळुरु शहरामध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीजवळ एक नवजात अर्भक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गुंडाळून फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या अर्भकाची स्थिती अतिशय वाईट होती. अर्भकाच्या अंगाला रक्त लागलेले होते आणि त्याच्या गळ्याला नाळ गुंडाळलेली होती, अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. नागेश यांनी दिली. नागेश यांनी या अर्भकाला ताब्यात घेतलं आणि जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केलं. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी देखील अर्भकावर मोफत उपचार केले. त्यानंतर नागेश यांनी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

स्वत:चं बाळ समजून पाजलं दूध!

दरम्यान पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना या नुकतीच प्रसूती रजा संपवून कामावर रुजू झाल्या होत्या. अर्चना यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे. नागेश यांनी आणलेल्या अर्भकाची अवस्था अर्चना यांना पाहावली नाही. अर्चना यांनी अर्भकाला जवळ घेतले आणि आईची माया देत त्याला दूध पाजले. “या अर्भकाची अवस्था पाहून मला सहन झाले नाही. त्याच्याकडे पाहून मला माझंच मूल रडत असल्यासारखं वाटलं. त्यामुळे मी त्याला जवळ घेतलं आणि दूध पाजलं”, अशी माहिती अर्चना यांनी दिली.

बाळाचं नाव ‘कुमारस्वामी’!

या बाळाचं नाव कुमारस्वामी असं ठेवण्यात आलं आहे. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी ‘आता हे बाळ सरकारचं आहे. आम्ही त्याला ‘कुमारस्वामी’ असं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच या बाळाची जबाबदारी सरकारची असणार आहे’, असं कुमारस्वामी यांनी सांगितलं. सध्या या नवजात बाळाला बंगळुरुच्या शिशू मंदिरामध्ये पाठवण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलं अर्चनाचं कौतुक

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विट करुन महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना यांचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, “त्या अर्भकाबद्दल ऐकून धक्का बसला. पण अर्चना यांनी त्या अर्भकाचा जीव वाचवला आहे. मी नक्कीच त्यांना भेटेन.”

सहकाऱ्यांकडून अर्चनाच्या कामगिरीला सलाम

तर दुसरीकडे बंगळुरु पोलिसांनी देखील फेसबुकवर अर्चना यांचं कौतुक केलं आहे. “आम्ही आमच्या सहकारी पोलीस कॉन्स्टेबल अर्चना यांना सलाम करतो. अर्चना यांनी एका नवजात अर्भकाला वाचवलं आणि त्याला स्तनपान केलं, असं पोलिसांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. #ThankYouArchana असा हॅशटॅग वापरुन पोलिसांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

First Published on: June 6, 2018 11:03 AM
Exit mobile version