भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक सहकार्याबाबत अपेक्षा

भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक सहकार्याबाबत अपेक्षा

बर्लिन इंटरनॅशनल फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतीय उद्योग महासंघाच्या सहयोगाने (सीआयआय) इंडिया नेटवर्किंग रिसेप्शन आयोजित केले होते. समारंभात प्रख्यात चित्रपट महोत्सव प्रमुख, आंतरराष्ट्रीय चित्रपट संघटना, चित्रपट एजन्सीज आणि प्रख्यात निर्मिती संस्था एकत्र आल्या होत्या. भारताशी सहयोग वाढविण्यात त्यांनी रस दाखविला.

भारतीय प्रतिनिधी मंडळाने जागतिक चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी यावेळी चर्चा केली. त्यांनी भारताबरोबर इफ्फी (भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव) मध्ये काम करण्याबाबत उत्साहाने तयारी दाखविली आहे आणि सहभाग नोंदविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तत्पूर्वी, बर्लिनेल येथील भारतीय चित्रपट विभागाचे उद्घाटन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते झाले. नोव्हेंबरमध्ये गोवा येथे होणार्‍या 51व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आले.

बर्लिनमध्ये लक्षवेधी छाप पाडल्यानंतर फिल्म फॅसिलिटेशन ऑफिस (एफएफओ)च्या सहकार्याने एक खिडकी योजनेतून भारतात चित्रपटांचे चित्रीकरण करण्याबाबत आशादायी आहे. चित्रकर्मींना या माध्यमातून भारतातील ‘सिनेमॅटिक टूरिझम’ घडविण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. माध्यम आणि करमणुकीसाठी अग्रगण्य स्त्रोत म्हणून भारताला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दृक्-श्राव्य सेवा क्षेत्राला भारत सरकारने यशस्वी सेवांपैकी एक म्हणून मान्यता दिली आहे.

या महोत्सवात प्रतीक वत्स यांचा ‘एब आले ऊ!’, पुष्पेंद्र सिंग यांचा लैला और सात गीत आणि अक्षय इंदीकर यांचा स्थलपुराण – जुनाट जागा.. या तीन चित्रपटांमुळे भारतीय सिनेमे अधोरेखित झाले आहेत. अक्षय इंदीकर यांचा मराठी चित्रपट ‘स्थलपुराण’ हा आठ वर्षाच्या दिघूची कथा सांगतो.

First Published on: February 23, 2020 5:33 AM
Exit mobile version