उत्कृष्ट गीतकार म्हणून जेव्हा मिळाला वाजपेयींना स्क्रिन अॅवॉर्ड

उत्कृष्ट गीतकार म्हणून जेव्हा मिळाला वाजपेयींना स्क्रिन अॅवॉर्ड

अटलबिहारी वाजपेयी

‘एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही माजी पंतप्रधान म्हणून ओळखले जाल, पण तुम्हाला माजी – कवी अशी ओळख कोणीही देणार नाही,’ हे म्हणणं होतं अजातशत्रू असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांचं. वाजपेयी आपल्या राजकारणासाठी तर ओळखले गेलेच. पण त्यांना त्यांच्या कवितांसाठीदेखील तितकंच ओळखलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना उत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांचा अल्बम ‘नई दिशा’साठी स्क्रीन अॅवॉर्डनं सन्मानित केलं होतं.

स्क्रीन अॅवॉर्डकडून करण्यात आलं होतं सन्मानित

अटल बिहारी वाजपेयी यांना २००० या वर्षात १९९९ मध्ये आलेल्या ‘नई दिशा’ या अल्बमसाठी इंडियन एक्स्प्रेसचा स्क्रीन अॅवॉर्ड देण्यात आला. या अल्बमसाठी ‘आओ फिर से दिया जलाये’ हे गाणं अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलं होतं. तर हे गाणं प्रसिद्ध गझल गायक जगजीत सिंह यांनी गायलं होतं. त्यावेळी अटलजी कामात व्यस्त होते. त्यामुळं या पुरस्कार सोहळ्याला जाऊ शकले नव्हते. त्यानंतर हा पुरस्कार सोहळा झाल्यानंतर इंडियन एक्स्प्रेस ग्रुपच्या अनन्या गोयंका यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना ‘बेस्ट नॉन फिल्मी लिरिक्स’चा पुरस्कार दिला होता. त्यावेळी त्यांच्याबरोबर श्रीदेवी आणि ऐश्वर्या या दोन्ही अभिनेत्रीदेखील उपस्थित होत्या. अटलजींचं कविता प्रेम हे कधीच कोणाहीपासून लपून राहिलेलं नाही आणि त्यांच्या कविता कायम त्यांच्याचप्रमाणे अमर राहणार आहेत.

अटलजींच्या अंत्यदर्शनासाठी रीघ

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं दिर्घ आजाराने गुरूवारी (१६ ऑगस्ट) निधन झाले. वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालेल्या अटलजींचे अनुयायी आणि शिष्य अवघ्या भारतात आहेत. या सर्वच अनुयायांनी आता दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी आणि निवासस्थानाच्या बाहेर गर्दी केली आहे. अटलजींचे पार्थिव त्यांच्या दिल्लीतील 6-A कृष्ण मेनन मार्गावरील घरी ठेवले असून तिथे राजकीय नेते आणि त्यांच्या अनुयायांनी दर्शन घेण्यासाठी रीघ लागली होती.

First Published on: August 17, 2018 4:07 PM
Exit mobile version