Bharat Bandh : रामलीलावर सरकारविरोधात विरोधकांची एकी

Bharat Bandh : रामलीलावर सरकारविरोधात विरोधकांची एकी

फोटो सौजन्य - ANI

पेट्रोल -डिझेल दरवाढीवरून सरकारविरोधात विरोधकांनी भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला सध्या संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. बंद दरम्यान दिल्लीतील रामलीला मैदानावर सरकारविरोधात  विरोधकांची एकी पाहायाला मिळाली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आदी नेते उपस्थित होते. यावेळी विरोधकांनी पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीवरून सरकारवर टीकास्त्र डागले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीवर यापूर्वी खूप बोलायचे. मग, आता शांत का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. शिवाय, शेतकऱ्याचे प्रश्न, महिला आणि इतर प्रश्नावर देखील नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. सरकारविरोधात विरोधकांची एकी झाली असून भाजपला सत्तेतून खाली खेचने हाच आमचा अजेंडा असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. आजपर्यंत पेट्रोल – डिझेल नव्वदीला पोहोचला आहे. त्यामुळे लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. याच मुद्यावरून काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली आहे.

भारत बंदला संमिश्र प्रतिसाद

देशभरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये बंदला हिंसक वळण लागले आहे. या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा दिला आहे. शिवाय, मनसेचे कार्यकर्ते देखील या बंदमध्ये रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेनेने मात्र या बंदपासून लांब राहणे पसंत केले. पण पेट्रोल पंपावर होर्डींग्ज लावून शिवसेनेनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. तसेच सामनातून देखील पेट्रोल – डिझेल दरवाढीवरून टीकास्त्र सोडले गेले आहे.

दरवाढीवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न 

२०१९च्या लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. २०१४ साली देखील महागाईच्या मुद्यांवरून तत्कालीन सरकार पायउतार झाले होते. यावेळी भाजपने दिलेल्या आश्वासनांचं काय झालं? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. त्यावरून आता विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

First Published on: September 10, 2018 12:30 PM
Exit mobile version