कर्नाटकामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, रोड शो दरम्यान अज्ञात व्यक्ती आली गाडीजवळ

कर्नाटकामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, रोड शो दरम्यान अज्ञात व्यक्ती आली गाडीजवळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्नाटकामधील रोड शो दरम्यान त्यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे आढळून आले. कर्नाटकातील दावणगेरे येथे रोड शो करत असताना एक अज्ञात व्यक्तींने मोदींच्या ताफ्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांला ताफ्यापासून दूर केले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी व्हाईटफील्ड (कडुगोडी) ते कृष्णराजपुरा या १३.७१ किमी लांबीच्या मेट्रो मार्गाचे कर्नाटकमध्ये उद्घाटन केले. 4,249 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मार्गावर 12 मेट्रो स्टेशन आहेत. उदघाटन केलेल्या मेट्रो मार्गावर मोदींनी प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रो कर्मचारी आणि कामगारांसह विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधला.

श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौऱ्यावर श्री मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी मोदी म्हणाले की, भारत सर्वांच्या प्रयत्नाने विकसित होत असून सर्वांच्या सहभागाने देश प्रगती करत आहे. चिक्कबल्लापूरच्या भूमीने लोकांना शिक्षण आणि आरोग्य देऊन मानवतेची सेवा करण्याचे ध्येय जोपासले आहे. ही कामगिरी आश्चर्यकारक ठरली आहे. तसेच आज येथे उद्घाटन होत असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयामुळे या महान मिशनला आणखी बळ मिळेल, असेही मोदी म्हणाले.

अमृत ​​महोत्सवात देश पुढे जात आहे
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशाचा विकास करण्याचा संकल्प केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. अनेक वेळा लोक विचारतात की इतक्या कमी वेळात भारताचा विकास कसा होईल? एवढी आव्हाने आहेत, एवढे काम आहे, ते इतक्या कमी वेळात कसे पूर्ण होणार? या प्रश्नाचे एकच उत्तर, ते म्हणजे प्रत्येकाचे प्रयत्न. भारतात गेल्या 9 वर्षांत आरोग्य सेवांमध्ये कार्यक्षमतेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच देशात वैद्यकीय शिक्षणाशी संबंधित अनेक सुधारणा करण्यात आल्या असल्याचे मोदींनी सांगितले.
चिकबल्लापूर हे आधुनिक भारताचे शिल्पकार सर एम. विश्वेश्वरय्या यांचे जन्मस्थान आहे. मला सर विश्वेश्वरायांच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण करण्याचे भाग्य लाभले. या पवित्र भूमीसमोर मी नतमस्तक आहे, असे मोदी म्हणाले.

First Published on: March 25, 2023 10:10 PM
Exit mobile version