बिहारमध्ये ११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली मुलगी

बिहारमध्ये ११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली मुलगी

बिहारमध्ये तीन वर्षाची मुलगी बोअरवेलमध्ये पडली

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यामध्ये लहान मुलगी बोअरवेलमध्ये पडल्याची घटना घडली आहे. तीन वर्षाची सना ११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडली आहे. सनाला बाहेर काढण्यासाठी काल रात्रीपासून जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. गेल्या २० तासापासून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

खेळता खेळता पडली बोअरवेलमध्ये

मंगळवारी दुपारी ३ वाजता सना घरासमोर खेळता खेळता बोअरलेलमध्ये पडली. सना आपल्या आजोळी आली होती. त्यावेळी ही घटना घडली आहे. बोअरवेलमधून ‘पप्पा पप्पा’ असा आवाज येत असल्याने सर्व जण बोअरवेलकडे गेले असता त्यामध्ये सना पडल्याचे समोर आले. सनाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. जवळपास ४४ फुटापर्यंत खड्डा खोदण्यात आला आहे. सनापर्यंत ऑक्सिजन पोहचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

सनाच्या मदतीसाठी कबर खोदणारे मजूर आले धावून

बचावकार्यासाठी प्रशासनाने अशा लोकांना बोलावले आहे जे कबर खोदण्याचे काम करतात. मृत्यूनंतर कबर खोदाणारी हे मजूर आता सनाचा जीव वाचवण्यासाठी एकजूट झाले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीमसोबत हे सर्व जण बचावकार्य करत आहेत. जवळपास ५० जण खड्डा खोदण्याचे काम करत असून आतापर्यंत ४४ फुटापर्यंत खड्डा खोदण्यात आला आहे.

बोअरवेलमधून येत आहे ‘पप्पा पप्पा’ आवाज

सना ३५ फुटावर बोअरवेलसाठी टाकण्यात आलेल्या प्लास्टिकच्या पाईपमध्ये अडकल्याचे बचावकार्यासाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसले आहे. यामध्ये सनाच्या हालचाली दिसत आहे. बोअरवेलमध्ये पडल्यापासून सना पप्पा पप्पा म्हणून आवाज देत आहे. तर दुसरीकडे सनाची आई बोअरवेलच्या आतमध्ये पाहून सनाशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. लपाछुपीच्या खेळामध्ये सना लपली असून सर्व जण तिचा शोध घेत आहेत असे तिची आई तिला भासवत आहे. सध्या सनासाठी बोअरवेलमध्ये चॉकलेट टाकण्यात आले आहेत.

सनाच्या जीवनासाठी प्रार्थना

सनाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे सना ज्या शाळेत शिकते त्या शाळेतील विद्यार्थी तिला वाचवण्यासाठी प्रार्थना करत आहेत. सनासाठी फक्त मुंगेर नाही तर संपूर्ण देश प्रार्थना करत आहेत. पटनामध्ये सनासाठी हवन-पूजा केला जात आहेत. तर लालू प्रसाद यांचा मुलगा तेज प्रताप याने देखील सनाच्या जीवनासाठी प्रार्थना केली आहे.

First Published on: August 1, 2018 2:00 PM
Exit mobile version