Coronavirus Vaccine : सप्टेंबरपर्यंत येणार ‘Corbevax’ ही आणखी एक स्वदेशी लस

Coronavirus Vaccine : सप्टेंबरपर्यंत येणार ‘Corbevax’ ही आणखी एक स्वदेशी लस

लसीकरणाची चिंता मिटली, राज्यांकडे १० कोटी लसींचा साठा शिल्लक

कोरोना विषाणूच्या संसर्गाने अख्ख्या जगाला वेठीस धरले आहे. त्यामुळे जगभरात कोरोना विषाणूविरोधात अनेक औषधे आणि लसींवर संशोधन सुरु आहे. यात रशिया, अमेरिका, भारतासह अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. भारतातही सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. ही लसीकरण मोहिम आता अधिक जलद होण्यासाठी आता भारतात आणखी एक स्वदेशी लस विकसित होणार आहे. ‘Corbevax’ असे या लसीचे नाव आहे. हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड या फार्मा कंपनीने ‘Corbevax’ ही नवी लस विकसित केली असून सप्टेंबर अखेरीसपर्यंत ती लाँच केली जाणार आहे.

आरबीडी प्रोटिन सब-युनिट असलेली लस 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे दोन महिन्यांनंतर येणारी ही लस बायोलॉजिकल-ई लिमिटेड कंपनीने विकसित केली आहे. आरबीडी प्रोटिन सब-युनिट असलेल्या या लसीची चाचणी तिसऱ्या फेज मध्ये आहे. आधीच्या दोन फेजमध्ये लसीचे रिपोर्ट प्रभावी आले आहेत. त्यामुळे येत्या काही महिन्यात ती बाजारात येण्याची शक्यता आहे.

भारत सरकारकडून प्री क्लिनिकल ट्रायलपासून आर्थिक मदत 

भारत सरकारकडून ‘मिशन कोविड सुरक्षा – भारतीय लस विकास अभियानांतर्गत ५ ते ६ लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना मदत केली जात आहे. यात स्वदेशी लस निर्मितीला सर्वाधिक चालना देण्यात येत आहे. त्यासाठी विविध कंपन्यांना संशोधन आणि विकासाच्या कार्याला भारत सरकारकडून आर्थिक मदत देण्यात येत आहे. बायोलॉजिकल-ई या कंपनीच्या लसीसाठी भारत सरकारकडून प्री क्लिनिकल ट्रायलपासून स्टेज तीनच्या अभ्यासापर्यंत मदत करण्यात आली आहे. या कंपनीला १०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक मदत करण्यात आली असून इतरही प्रकारची सर्व मदत सरकारकडून करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लसींचे ४५.३७ कोटी पेक्षा जास्त डोस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. अनेक राज्ये / केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांमध्ये सध्या लसींचे ३.०९ कोटी पेक्षा जास्त डोस उपलब्ध आहेत. त्याचवेळी गेल्या २४ तासांत देशात १८,९९,८७४ नागरिकांना लस देण्यात आली. त्यामुळे आत्तापर्यंत ४३,५१, ९६,००१ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या देशात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही लसींचा लसीकरणाच्या कार्यक्रमात वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन लस फायझरच्या वापरालाही या मंजुरी मिळाली आहे.


 

 

First Published on: July 26, 2021 3:39 PM
Exit mobile version