आता भाजपचे लक्ष्य नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुका; मोदी देणार कानमंत्र

आता भाजपचे लक्ष्य नऊ राज्यांच्या विधानसभा निवडणुका; मोदी देणार कानमंत्र

नवी दिल्लीः भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक १६ व १७ जानेवारीला नवी दिल्ली येथे होणार आहे. या बैठकीत विधनासभा निवडणुकीच्या विजयाचा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप नेत्यांना देणार आहेत. या वर्षी नऊ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

विधानसभा निवडणुकीची रणनिती व या निवडणुकीतील विजयाचे नियोजन यावर आधारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण असणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी विजयाचा नेमका काेणता कानमंत्र देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १६ जानेवारीला भाजप मुख्यालयात या बैठकीची सुरुवात होणार आहे. या बैठकीचे अध्यक्षपद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे महासचिव, प्रदेशाध्यक्ष, सहअध्यक्ष, प्रदेश महासचिव, राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सचिव व राष्ट्रीय प्रवक्ता यांच्यासह राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीची सांगता पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाने होणार आहे. या भाषणात मोदी निवडणुका विजयासह संघटना बळकटीकरणावरही उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

या दोन दिवसांच्या बैठकीत मुखतः संघटना वाढवण्यावर चर्चा होणार आहे. नऊ राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या नियोजनावरही बैठकीत चर्चा होणार आहे. त्रिपुरा, नागालॅंड, मेघालय, कर्नाटक, मिझोराम, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश व तेलंगणा या नऊ राज्यात विधानसभा निवडणुका होणार असल्याने तेथील भाजपा पदाधिकाऱ्यांना बैठकीत विशेष मार्गदर्शन केले जाईल. निवडणुकांसाठी काय तयारी केली आहे याची माहितीही तेथील पदाधिकाऱ्यांकडून घेतली जाईल व त्यानुसार निवडणुकीचे नियोजन केले जाईल.

राजकारणात भाजपसमोर काय काय पर्याय आहेत यावरही बैठकीत चर्चा केली जाईल. गेल्या काही महिन्यात केंद्र सरकारने जनहिताचे कोणकोणते निर्णय घेतले याची माहिती बैठकीत दिली जाईल. तसेच प्रत्येक राज्यातील भाजप कार्यकारिणीला त्यांनी केलेल्या कामाचा तपशील बैठकीत द्यावा लागेल. तसेच त्यांच्या कामाचाही आढावा घेतला जाईल. बैठकीचे मुख्य ध्येय हे संघटनेची वाढ करणे हेच असणार आहे. गेल्यावर्षी हैद्राबाद येथे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती.

 

First Published on: January 5, 2023 10:57 PM
Exit mobile version