वर्षभरातील निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी आणि जनसंपर्क यात्रांवर भाजपाचा भर

वर्षभरातील निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी आणि जनसंपर्क यात्रांवर भाजपाचा भर

नवी दिल्ली : केंद्रातील सत्ता टिकवून ठेवण्यासाठी यंदाच्या देशभरातील विविध विधानसभा निवडणुकीत आपला विजय निश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच जनविश्वास यात्रांवर भाजपाने भर देण्याचे ठरविले आहे. जनसंपर्क यात्रा आणि पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यांचा वापर करून भाजपाने २०१९ मध्ये सत्ता मिळवल्यावर यावर्षी होणाऱ्या सहा राज्यांतील निवडणुकांसाठी देखील प्रचारासाठी हीच रणनीती आखण्यात येणार आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत जनविश्वास यात्रेचा पक्षाला मोठा फायदा झाल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. तसेच युवा आणि महिलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल क्रेझ असल्याने मोदींची दुसरी यात्रा कोणतीही आखणी न करता अचानक काढण्यात आल्याचेही सांगितले जाते.

मध्य प्रदेशातील विकास यात्रा आणि राजस्थानमधील जनआक्रोश यात्रेलासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसत असल्याने भाजपाने यावर्षीही सर्व निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या नावाने यात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. या यात्रांच्या आखणीला लवकरच सुरूवात केली जाईल.

जिथे सत्ता, तिथे कर्तृत्वाची जाहिरात
यात्रासंबंधीची रणनीती वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळी आहे. ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे, त्या राज्यात सरकारचे कर्तृत्व आणि पंतप्रधानांच्या चेहऱ्याचा वापर करण्याची योजना आहे. त्यानुसारच यात्रांची नावे ठेवण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशात विकासयात्रा आणि कर्नाटकात विजयसंकल्प यात्रा काढण्यात येणार आहे. त्रिपुरासारख्या राज्यात भाजपाची सत्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी जनविश्वास यात्रा काढण्यात आली आणि सरकारचे अपयश सांगण्यावर जास्त भर देण्यात आला. म्हणूनच राजस्थानमध्ये जनआक्रोश यात्रा आणि तेलंगणामध्ये प्रजा गोसा, भाजपा भरोसा यात्रा काढत आहे.

मोदींच्या जाहीर सभेने होणार यात्रांची सांगता
भाजपाने प्रचार रणनीतीअंतर्गत बुधवारी तेलंगणामध्ये प्रजा गोसा, प्रजा भरोसा यात्रा आणि कर्नाटकमध्ये विजयसंकल्प यात्रेची सुरूवात केली. कर्नाटकमध्ये चारही दिशांनी चार यात्रा काढण्यात येणार आहेत. दोन्ही राज्यांत यात्रेची सांगता पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेने होणार आहे. भाजपा मध्य प्रेदश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्येही एप्रिल, मे आणि जूनमध्ये नवीन यात्रांची सुरुवात होणार आहे.

First Published on: March 2, 2023 9:13 AM
Exit mobile version