स्विस बँकेतील काळा पैसा ८० टक्क्यांनी घटला – अर्थमंत्री पियुष गोयल

स्विस बँकेतील काळा पैसा ८० टक्क्यांनी घटला – अर्थमंत्री पियुष गोयल

अर्थमंत्री पियुष गोयल

भाजप पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून स्विस बँकेत काळा पैसा जमा करण्याचे प्रमाण ८० टकक्यांनी कमी झाले असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी राज्यसभेत दिली आहे. वर्ष २०१४ ते २०१७ दरम्यान काळा पैसा जमा होण्याचे प्रमाण ८० टक्क्यांनी घसरले आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ साली ३४ टक्क्यांनी काळ्या पैशाचे प्रमाण घटले असल्याचे गोयल यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी सरकारवर केलेल्या टीकेचाही गोयल यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, गांधी यांनी विषयाची गंभीरता जाणून न घेता निराधार आरोप केले. सत्य जाणून न घेता आरोप करणे ही त्यांची सवयच झाली असल्याचे गोयल म्हणाले.

काही दिवसांपूर्वी स्विस बँकेतर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालाचे विश्लेषण करताना भारतीयांचा काळा पैसा ५० टक्क्यांनी वाढला, या मथळ्याखाली बातम्या केल्या गेल्या होत्या. वास्तवात मात्र स्विस बँकेच्या नॉन डिपॉझिट लायबलिटिज, भारतातील स्विस बँकेचा नफा, बँकेचे अंतर्गत व्यवहार या सर्वांचा समावेश माध्यमांनी चुकीच्या पद्धतीने केला असल्याचे गोयल यांनी सांगितले. विरोधकांनीही मग मोदी सरकार भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यात कुचकामी असल्याचा आरोप केला होता. मात्र आता सत्य समोर आले असून स्विस बँकेत काळा पैसा वाढलेला नाही तर उलट कमी झालेला आहे, असे पियुष गोयल यांनी सांगितले.

इंडियन नॅशनल लोक दलाचे खासदार राम कुमार काश्यप यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना गोयल यांनी ही माहिती दिली. स्विस बँकेत डिपॉझिट होत असलेला पैसा हा काही सरसकट काळा पैसा नसतो, असे गोयल यांनी सांगितले.

 

 

 

First Published on: July 24, 2018 5:10 PM
Exit mobile version