अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटाचे सत्र सुरूच; दोन बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोटाचे सत्र सुरूच; दोन बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी

अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांत अनेक स्फोट झाले आहेत. आता आणखी एक बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अफगाणिस्तानातील बल्ख प्रांतातील शहर मजार-ए-शरीफजवळ बसमध्ये दोन बॉम्बस्फोट झाला आहे. या बॉम्बस्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. मृतांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू असल्याचं समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटांची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही. मात्र या दोन्ही बॉम्बस्फोटात सार्वजनिक वाहतुकीला लक्ष्य करण्यात आल्याचं समजतं. अफगाणिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार 21 एप्रिल रोजी दुपारच्या नमाजच्या वेळी मजार-ए-शरीफमध्येच सेह डोकान मशिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि 58 लोक जखमी झाले होते.

दहशतवादी संघटना इसिसने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. शिया मशिदीवर बॉम्ब हल्ल्याची योजना आखणाऱ्या इसिसच्या संशयित दहशतवाद्याला तालिबानी सैन्याने अटक केली. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये 21 एप्रिल रोजी रस्त्याच्या कडेला झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली. शियाबहुल भागाजवळ हा स्फोट झाला. याच्या दोन दिवसांपूर्वी याच परिसरात शैक्षणिक संस्थांना लक्ष्य करून अनेक स्फोट घडवण्यात आले होते.

या बॉम्बस्फोटांमध्ये सुमारे सहा मुलांचा मृत्यू झाला आणि 17 जण जखमी झाले. अब्दुल रहीम शहीद हायस्कूलमध्ये आणि काबूलजवळील शियाबहुल भागातील दश्त-ए-बरची येथील मुमताज एज्युकेशन सेंटरजवळ हे बॉम्बस्फोट झाले. 22 एप्रिल रोजी कुंदुझच्या उत्तरेकडील प्रांतातील एका मशिदीत स्फोट होऊन यात 33 लोक मारले गेले.

अफगाणिस्तानमधील शिया समुदायावर अनेकदा प्राणघातक हल्ल्यांची जबाबदारी इसिसने स्वीकारली आहे. शिया अफगाण बहुतेक हजारा वांशिक समुदायाचे आहेत.


हेही वाचा – अयोध्येतील वातावरण बिघडवण्याचा कट, 2 मशिदीबाहेर आक्षेपार्ह कागदपत्रे फेकली; 7 जणांना अटक

First Published on: April 29, 2022 10:47 AM
Exit mobile version