ट्रोल होऊनही बॉलीवूडस्टार्स का करतात पान मसाल्याच्या जाहीराती? हे आहे कारण

विमल पान मसाल्याची जाहीरात केल्याने बॉलीवूडस्टार अक्षय कुमार सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. यामुळे अक्षयने सावध पवित्रा घेत या जाहीरातीतून काढता पाय घेतला असून चाहत्यांची जाहीर माफीही मागितली आहे. तसेच जाहीरातीतून मिळालेले पैसे गरजूंना दान करणार असल्याचेही तो म्हणाला आहे. पण अशा प्रकारे पान मसाल्याची जाहीरात केल्याने याआधीही अनेक देशी विदेशी स्टार्सवर टीकेची झोड उठली आहे. पण तरीही स्टार्समध्ये पान मसाल्याच्या जाहीरातीत काम करण्याचे क्रेझ मात्र कायम आहे. यामागचे कारण आहे पान मसाला व्यवसायाची कोट्यवधींची उलाढाल.

ऑक्टोबर २०१६ मध्ये हॉलीवूडस्टार पियर्स ब्रॉसनन याने जेम्स बॉंडच्या व्यक्तीरेखेत पान बहारची जाहीरात केली होती. त्यावेळीही ब्रॉसनन यांच्यावर चहूबाजूकडून टीका करण्यात आली होती. त्यानंतर ब्ऱॉसनन याने जाहीर माफी मागत पान मसाल्यात तंबाखू आणि सुपारी असल्याचे आपणाला सांगण्यात आले नव्हते यामुळेच आपण ही जाहीरात केल्याचे स्पष्टीकरण दिले. पण तरीही या जाहीरातीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर केंद्र सरकारने या जाहीरातीवरच बंदी घातली. पण त्यानंतर अजून एक मुद्दा चर्चेत आला होता. या मुद्द्यात पान मसालाची जाहीरात करण्यासाठी बडे स्टार्स तयार का होतात. यावर चर्चासत्र सुरू झाले. तसेच चित्रपटात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या महागड्या स्टार्सला या पान मसाल्याच्या जाहीरातीत काम करण्यासाठी कोट्यवधी रुपये कंपनी मानधन म्हणून देते . यामुळेच स्टार्स पैशांच्या मोहापायी पान मसाल्याच्या जाहीराती हसत खेळत करतात हे समोर आले. पण पान मसाला कंपन्यां मात्र पान मसाला हे वेलचीयुक्त माऊथ फ्रेशनर असल्याचाच दावा करत त्याची विक्री करत होते.

मात्र मार्केट रिसर्च फर्म imarc ने केलेल्या सर्वेत भारतात तंबाखू आणि सुपारी खाणारा मोठा वर्ग असून पान मसाल्यातून कंपनीला कोट्यवधीचा फायदा होत असल्याचे समोर आले. २०२१ मध्ये पान मसाल्याचे मार्केट ४१,८२१ कोटींवर पोहचले . तर २०२७ मध्ये ५३ हजार कोटींपर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात २७ कोटींहून अधिक व्यक्ती तंबाखूचे सेवन करतात. विशेष म्हणजे जगात तंबाखू सेवन करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तसेच एका अहवालानुसार आपल्या देशात तंबाखू आणि सिगारेटच्या सेवनामुळे कॅन्सर आणि तत्सम फुफ्फुसाशी निगडीत आजाराने दिवसाला ३, ५०० माणसांचा मृत्यू होतो.

ही धक्कादायक बाब असून जर यावर वेळीच उपाययोजना न केल्यास तंबाखू आणि सिगारेटच्या व्यसनाने सर्वाधिक लोकांचा मृत्यू होणारा देश म्हणून भारत जगभरात ओळखला जाईल. तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेनुसार शहरी भागात शहरी भागात २९ टक्के आणि ग्रामीण भागात ४३ ट्कके पुरुष तंबाखूचे सेवन करतात.त्यातही ग्रामीण भागात राहणाऱ्या ११ टक्के आणि शहरांमध्ये राहणाऱ्या ५ टक्के महिला तंबाखू खातात. तसेच जागतिक आरोग्य संघटना WHO च्या ग्लोबल अॅडल्ट टॉबेको सर्वेनुसार भारतात वयाच्या १७ व्या वर्षापासूनच तरुण मुले तंबाखूचे सेवन करू लागतात. याचाच परिणाम म्हणून देशात दरवर्षी तोंडाच्या कॅन्सरमुळे १० लाख नागरिकांचा मृत्यू होतो.

यामुळेच जेव्हा मोठे स्टार्स ज्यांचे लाखो करोडो चाहते देशात आहेत ते तंबाखू किंवा सिगारेटची जाहीरात करतात तेव्हा साहजिकच त्याचा जनमाणसावर परिणाम होतो. ते जे करतात त्याचेच अनुकरण त्यांचे चाहते करतात. यामुळेच पान मसाल्याची जाहीरात करणाऱ्यांना ट्रोल केले जाते. पान मसाल्याच्या जाहीरातीचे कलाकारांना कोट्यवधी रुपये मिळतात. यामुळे अनेकवेळा ट्रोल होऊनही तसेच अशा जाहीरातीतून चुकीचा संदेश चाहत्यांना मिळू शकतो हे माहित असूनही स्टार्स त्या जाहीरातीत पैशांच्या हव्यासापोटी काम करतात.

First Published on: April 22, 2022 6:34 PM
Exit mobile version