ब्राह्मणांच्या आरक्षणाची मागणी

ब्राह्मणांच्या आरक्षणाची मागणी

प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना आरक्षण जाहिर झाल्यानंतर आता देशातील अनेक भागांमध्ये आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. आता, गुजरातमधील राजपूत आणि ब्राह्मण समाजाने आरक्षणाची मागणी केली आहे. त्यासाठी ब्राह्मण आणि राजपूत संघटनांनी इतर मागासवर्गीय आयोगाकडे धाव घेतली आहे. गुजरातमध्ये राजपूत समाजाचे प्रमाण ८ टक्के आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी राजपूत समाजाच्या नेत्यांनी केली आहे. तर, ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी देखील आरक्षणाची मागणी केली आहे. त्यासाठी समस्त गुजरात ब्राह्मण समाजाने ओबीसी आयोगाला पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी ब्राह्मण समजाच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे. सर्वेक्षणानंतर आम्हाला आरक्षण द्या असं ब्राह्मण समाजाचं म्हणणं आहे. गुजरातमधील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मणांची संख्या ६० लाख आहेत अर्थात टक्केवारीमध्ये हे प्रमाण ९ टक्के आहे. त्यातील ४२ लाख आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आला आहे. परिणामी ब्राह्मणांचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी मागणी आता जोर धरताना दिसत आहे.

गुजरातमधील राजपूत समाज संघटनेनं ओबीसीच्या आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. त्यावेळी त्यांना निवेदन देखील देण्यात आलं. राजपूत गारसिया समाजाचा ओबीसीत समावेश करावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. राजपूत गारसिया समाजातील महिलांचे उत्पन्न देखील कमी आहे. शिवाय, हा समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे राजपूत समाजाला नोकरीत आणि शिक्षणात पुरेशी संधी मिळत नाही, असं संघटनेनं म्हटलं आहे. या साऱ्या प्रश्नावर आता गुजरात राज्यसरकार काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे.

First Published on: November 30, 2018 4:44 PM
Exit mobile version